भाजप व संघाच्या नेत्यांच्या घरातील कुत्राही कधी देशासाठी मेला नाही: खर्गे

जळगाव : रायगड माझा वृत्त 

Mallikarjun Kharge

महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले; परंतु भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या घरातील कुत्राही मेला नाही आणि आज हे देशप्रेमाचा आव आणत आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. फैजपूर येथून कॉंग्रेसतर्फे आजपासून दुसऱ्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेस प्रारंभ झाला, यावेळी ते बोलत होते.

देशातील व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात जनतेला जागृत करण्यासाठी कॉंग्रेसतर्फे राज्यभर जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. त्याअंतर्गत फैजपूर येथून दुसऱ्या टप्प्यातील यात्रेस प्रारंभ झाला. धनाजी नाना महाविद्यालयाच्या मैदानावर खर्गे यांच्या हस्ते ज्योत पेटवून यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.

खर्गे म्हणाले, “देशात आज महिलांवर अत्याचार होत आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, मात्र मोदी गप्प आहेत ते त्याबाबत काहीही बोलत नाहीत. संसदेत याबाबत काहीतरी बोला, असे आम्ही त्यांना आवाहन करतो; परंतु न बोलता ते संसदेतून निघून जातात. भाजप सरकार संविधान जाळण्याचे काम करीत आहे, त्यामुळे या पक्षाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही.”

सरकार बदला : चव्हाण 
अशोक चव्हाण म्हणाले, “”भाजपच्या काळात महिला सुरक्षित नाहीत, पत्रकार सुरक्षित नाहीत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सरकार जनतेची मुस्कटदाबी करीत आहे. फडणवीस सरकारने अनेक आश्‍वासने दिली; मात्र त्यापैकी एकही पूर्ण केलेले नाही. शेती कर्जमाफी तर अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. देशातील आणि राज्यातील भाजप सरकारे कोणत्याही कामाची नाहीत, ती बदललीच पाहिजेत.”

पंतप्रधानांचे मौन का? 
नवी दिल्ली : रुपया गाळात गेला आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केली. रुपयाच्या अवमूल्यनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन का?, असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले, ‘‘रुपयाचे अवमूल्यन झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन का बाळगले आहे. इंधन आणि गॅसच्या दराचा भडका उडालेला असून, जनतेत मोठ्या प्रमाणात क्षोभ निर्माण झाला आहे.’’

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत