भाडे तीस हजार……… दुरूस्तीचा खर्च नव्वद हजार

साशाच्या बेजबाबदारपणामुळे कॉम्पॅक्‍टरच्या हायड्रोलिकचे वाटोळे

रायगड माझा वृत्त 

सातारा- सातत्याने वादग्रस्त कारभारामुळे चर्चेत असलेल्या आणि सातारा शहराच्या स्वच्छतेची धुरा वाहणाऱ्या ठेकेदार साशा कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे सातारा पालिकेच्या कॉम्पॅक्‍टरचे वाटोळे झाले आहे. कंपनीकडे कुशल चालक नसल्याने कॉम्पॅक्‍टरची हायड्रोलिक सिस्टिम खराब झाली असून त्यामुळे पालिकेला तब्बल नव्वद हजार रूपये खर्चाचा भार पडला आहे. सातारा परिवहन विभागाचे कुशल चालक हे बाजूलाच राहिल्याने पालिकेने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. कॉम्पॅक्‍टरचे भाडे मिळणार तीस हजार आणि खर्च नव्वद हजार त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असा तुगलकी कारभार यानिमित्ताने पाहावयास मिळाला आहे.

संग्रहित चित्र

आरोग्य सभापती यदुनाथ नारकर यांनी तातडीने लक्ष घालून हा प्रश्‍न सोडवावा अशी सातारकरांना अपेक्षा आहे. सातारा शहराचे प्रतिनिधित्व करणारे सातारा नगरपालिका आणि तिची महसूल वृध्दी हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. नगरसेवकांच्या टक्‍केवारीच्या लाथाळ्यात कोणालाच रचनात्मक कार्य करण्याची इच्छा होईनाशी झाली आहे. सातारा पालिकेचे नगरसेवक हे मलिदा बहाद्दर आहेत. असा आरोप होऊ लागला असून त्याला खतपाणी घालणाऱ्या घटना वारंवार समोर येत आहेत.

सातारा पालिकेचा कॉम्पॅक्‍टर गेल्या चार दिवसापासून परिवहन विभागात हायड्रोलिक यंत्रणेच्या बिघाडामुळे उभा असून सातारा पालिकेला सातारा शहरातील कचरा उचलण्यासाठी खाजगी ट्रॅक्‍टर भाड्याने लावण्याची वेळ आली आहे. स्वच्छता सर्वेक्षण अभियानामध्ये कचरा कुंडी मुक्‍त शहराला विशेष मार्क आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपला कचरा घंटागाडीतच टाकावा या करीता आरोग्य विभागाचे विशेष प्रयत्न चालू आहेत. मात्र या कामांना साशा कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे ब्रेक लागला आहे. कॉम्पॅक्‍टर चालवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाची विशेष परवाना असणारे चालक असावे लागतात. ते चालक साशा कंपनीकडे नसल्यामुळे कॉम्पॅक्‍टरच्या हायड्रोलिक सिस्टिमची दुरावस्था झाली आहे. खऱ्या अर्थाने ज्या वेळी कॉम्पॅक्‍टरची गरज आहे, त्यावेळी बिघडलेला कॉम्पॅक्‍टर तब्बल चार दिवस परिवहन विभागात उभा करण्याची वेळ आली आहे.

चुकीच्या गिअर ऑपरेटिंगमुळे हायड्रोलिक बारवर ताण
इ.स. 2012 मध्ये सातारा पालिकेने 13 लाख रूपये खर्चुन स्वंतत्र चासी आणि त्यावर हायड्रोलिक सिस्टिम असा कॉम्पॅक्‍टर डिझाईन केला होता. त्यावेळी बाराव्या वित्त आयोगातून पालिकेने पाठपुरावा करून सातारकरांसाठी ही सुविधा उपलब्ध केली होती. सातारा शहरात जमा होणाऱ्या चाळीस टन कचऱ्यापैकी 11 टन कचरा हा कंटेनरमध्ये जमा होत होता. हे कंटेनर उचलून सोनगावच्या कचरा डेपोत रिकामे करणे आणि पुन्हा शहरात ठिकठिकाणी त्यांना आणून ठेवणे ही परिवहन विभागाची जबाबदारी होती. पालिकेकडे असताना कॉम्पॅक्‍टरच्या हायड्रोलिक सिस्टिमने कधीच त्रास दिला नाही, मात्र जसा हा कॉम्पॅक्‍टर साशा कंपनीकडे 30 हजार रूपये महिना भाड्याने गेला तसा त्याच्या कुरबूरी चालू झाल्या. साशा कंपनीचे चालक या कॉम्पॅक्‍टरसाठी प्रशिक्षित नसल्याने कॉम्पॅक्‍टरच्या हायड्रोलिक सिस्टिमचा घोळ झाला आहे.

कंटेनर उचलण्यापासून ते कॉम्पॅटरमध्ये घेईपर्यंत पाच गिअर वापरावे लागतात. हे गिअर वापरताना विशिष्ट प्रणालीचा अंमलात आणावी लागते. मात्र साशाच्या चालकांकडून ही ऑपरेटिंग सिस्टिम धरसोड पध्दतीने होत असल्याने कॉम्पॅक्‍टरच्या हायड्रोलिक बारला दणका बसून पुलिंग सिस्टिम खराब झाल्याची माहिती आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

तांत्रिक बिघाड की आर्थिक सोय
देखभाल दुरूस्ती हा शब्द सातारा पालिकेत सोयिस्कर लाभासाठी वापरला जातो. ठेकेदार आणि नगरसेवक यांच्यातील मधुर संबंधाचा हा परवलीचा शब्द नगराध्यक्षांच्या दालनात आरोग्य सभापती यदुनाथ नारकर यांचा जो सात्विक संताप झाला, त्याला बरेच राजकीय संदर्भ होते. मात्र आरोग्य विभागाच्या कारभारावर सतत संशयाचे ढग जमा होत असतात. कॉम्पॅक्‍टर जर चार चार दिवस दुरूस्त न होता उभा राहत असेल आणि खाजगी ट्रॅक्‍टरला भाड्याने कचरा उचलण्याच्या कामाला लावले जात असेल तर तांत्रिक बिघाड की आर्थिक सोय अशी दुहेरी चर्चा पालिकेत ऐकायला मिळत आहे. घंटागाडी आणि ट्रॅक्‍टर निघून गेल्यानंतर शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. नव्वद हजार रूपये दुरूस्तीचा खर्च तातडीने होत नाही आणि स्थायी समितीतून हा विषय तात्काळ रद्द केला जातो म्हणजेच साशा कंपनीचे काळजीवाहू सरकार पालिकेत कोणाच्या आशीर्वादाने नांदते याचा जाब आरोग्य विभागाला विचारण्याची वेळ आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.