भारताचा वेस्ट इंडिजवर १ डाव २७२ धावांनी ‘शॉ’नदार विजय

राजकोट : रायगड माझा वृत्त

भारत वि. वेस्ट इंडिजमध्ये होत असलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर एक डाव आणि २७२ धावांनी विजय मिळवला आहे. एकीकडे भारतीय फलंदाजांनी ६४९ धावांचा डोंगर उभा केला, तर दुसरीकडे भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे विंडीजचा पहिला डाव १८१वर तर दुसरा डाव १९६ वर आटोपला. या विजयासोबतच कसोटी मालिकेमध्ये भारताने १-०ने आघाडी घेतली आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर पृथ्वी शॉ ,कर्णधार विराट कोहली आणि रविंद्र जडेजाच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ६४९ धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करता करता विंडीजची दुसऱ्या दिवसाअखेर ६ बाद ९४ अशी दुरावस्था झाली. तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होता काही तासांतच वेस्ट इंडिजचा सगळा संघ १८१वर बाद झाला. भारतीय संघाने विंडीजला फॉलो ऑन देत पुन्हा फलंदाजीची संधी दिली. पण याही डावात तिसरा दिवस संपण्याच्या आधीच भारताच्या गोलंदाजांनी विंडीजच्या संपूर्ण संघाला १९६वर बाद केले. २७२ धावांची बढत आणि एका डावासह हा विक्रमी विजय भारताने वेस्ट इंडिजवर मिळवला आहे.
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात आर अश्विनने ३७ धावा देत ४ विकेट घेतल्या तर मोहम्मद शामीने २२ धावा देत २ विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि उमेशने एक-एक विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांनी आक्रमक खेळी करत ४८ षटकांमध्येच वेस्ट इंडिजला पहिल्या डावात गारद केलं. ४६८ धावांच्या बढतीसह भारताने विंडीजला फॉलो ऑन दिले. विंडीज पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. यावेळी कुलदीप यादवने ५७ धावा देत पाच विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजाने तीन आणि आर अश्विनने ७१ धावा देऊन दोन विकेट घेतल्या. दोन्ही डावांमध्ये भारतीय गोलंदाजांनी विंडीजला २००चा आकडाही पार करू दिला नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत