भारतातील पहिल्या पेंग्विनचा मृत्यू

मुंबई : रायगड माझा वृत्त 

भायखळा येथील राणीच्या बागेत १५ ऑगस्ट रोजी जन्माला आलेल्या भारतातील पहिल्या पेंग्विनचा सातव्या दिवशी म्हणजे २२ ऑगस्टच्या रात्री मृत्यू झाला. हे पिल्लू अंड्यात तयार होत असताना पिवळा बलक योग्यरित्या वापरला न गेल्यामुळे ते जगले नसावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

२६ जुलै २०१६ला दक्षिण कोरियातील क्वॅक्‍स प्राणिसंग्रहालयातील आठ पेंग्विन भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले होते. त्याच वर्षी २३ ऑक्‍टोबरला ड्युरी या दीड वर्षांच्या मादीचा संसर्गाने मृत्यू झाला.

या प्राणिसंग्रहालयातील फ्लिपर या मादीने जुलैमध्ये अंडे दिले होते. त्यानंतर बरोबर ४० दिवसांनी, १५ ऑगस्टला भारतातील या पहिल्या पेंग्विनचा जन्म झाला होता. आई फ्लिपर आणि पिता मॉल्ट हे दोघेही पिल्लाची योग्य प्रकारे काळजी घेत होते. जन्मताच ७५ ग्रॅमचा असलेल्या या पिल्लाचे वजन दोन दिवसांत ८३ ग्रॅम झाले होते. त्याची वाढ योग्य प्रकारे होत होती. मात्र, बुधवारी (ता. २२) सकाळपासूनच या पिल्लाची प्रकृती ढासळू लागली. राणीच्या बागेतील पशुवैद्यकीय पथकाने त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. मात्र, त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला, असे पेंग्विनची देखभाल करणाऱ्या डॉ. मधुमती काळे यांनी सांगितले.

मृत्यूचे प्रमाण 
पेंग्विनचे अंडे आणि पिल्लू मृत होण्याचे प्रमाण सरासरी ६० टक्के असते. पहिल्या ३० दिवसांत पिल्लू मृत होण्याचे प्रमाण ३० ते ३५ टक्के असते.

लिंग कळण्यापूर्वीच…
पेंग्विनच्या जन्मानंतर आठ ते दहा दिवसांनी त्याचे लिंग कळते. त्यासाठी काही वेळा डीएनए चाचणीही करावी लागते. मात्र, या पिल्लाचे लिंग कळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मृत्यूचे कारण 
गुरुवारी पक्षितज्ज्ञांनी सकाळी ९.३० वाजता प्राणिसंग्रहालयातील पशुरुग्णालयात पेंग्विनच्या पिल्लाचे शवविच्छेदन केले. अंड्यात पिल्लाच्या वाढीच्या काळात पिवळा बलक पूर्णपणे वापरला न गेल्यामुळे तसेच यकृतातील बिघाडामुळे हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे उद्यानाचे अधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत