भारतात आलेल्या चिनी तरूणीवर खजुराहो येथे सामूहिक बलात्कार

रायगड माझा वृत्त :

भारत पाहण्यासाठी आलेल्या चिनी तरूणीवर मध्य प्रदेशमधील पर्यटन स्थळ असलेल्या खजुराहो येथे सामूहिक बलात्कार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडित तरूणीने उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खजुराहो येथील काही स्थानिक तरूणांनी चहामध्ये अमली पदार्थ टाकून निर्जन स्थळी आपल्यावर बलात्कार केल्याचे पीडित तरूणीने तक्रारीत म्हटले आहे.

पीडित तरूणी २५ वर्षांची असून ती चीनमधील गुइझाऊ येथील रहिवासी आहे. २५ दिवसांपूर्वी ती भारतात पर्यटनासाठी आली होती. दि. २८ डिसेंबरला ती दिल्लीहून मध्य प्रदेशला आली होती. ३० डिसेंबरला हॉटेलमधून ती पायी संग्रहालयाकडे जात होती. त्यावेळी ती एका चहाच्या दुकानात थांबली. तिथे उभे असलेल्या काही तरूणांनी तिच्याशी गप्पा मारल्या आणि चहा पिण्यास दिला. चहा पिल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. त्यानंतरही ती संग्रहालयात गेली. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच ती पुन्हा हॉटेलकडे निघाली.

हॉटेलवर परतत असताना त्याच चहाच्या दुकानावर ते तरूण पीडित मुलीला दिसले. तिने त्यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी पुन्हा तिला चहा दिला आणि हॉटेलला सोडण्याचा बहाणा करत तिला गाडीत बसवले. त्यानंतर ती बेशुद्ध पडली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती निर्जन स्थळी होती. त्यावेळी तिला काहीच समजले नाही. ती हॉटेलवर गेली आणि तेथून ती सोमवारी (दि.३१) आग्रा येथे आली.

रेल्वे प्रवासात तिला आणखी दोन चिनी नागरिक भेटले. त्यांनी तिला पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. बेशुद्ध असताना आपल्यावर संशयित तरूणांनी बलात्कार केल्याचा संशय तिने तक्रारीत व्यक्त केला आहे. पोलीस अधिकारी मोहम्मद मोहसीन खान यांनी पीडित तरूणी ही विद्यार्थीनी असून ती एकटी भारत फिरायला आल्याचे सांगितले. पुढील तपासासाठी तक्रारीची प्रत खजुराहो पोलिसांना पाठवली असून पीडित तरूणीलाही वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत