भारतावर आदळणार उष्ण लाटा

नागपूर : रायगड माझा वृत्त

इंटरगर्व्हनमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) संशोधनानुसार जागतिक तापमान जर दीड अंशांनीही वाढ झाली तर भारतावर उष्ण हवेच्या लाटा आदळू शकतात. या गरम हवांच्या लाटांमुळे उष्माघाताचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. २०१५ मध्ये अशाच लाटांमुळे भारतात अडीच हजार लोकांचा उष्माघाताने बळी गेला होता. डिसेंबरमध्ये पोलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवामान बदल परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयपीसीसीने हे संशोधन नुकतंच प्रसिद्ध केलं आहे. या संशोधनानुसार वैश्विक तापमानवाढीचा सर्वाधिक परिणाम भारतीय उपखंडावर होणार आहे. जगाचं तापमान दीड-ते दोन अंशाने वाढल्यास भारतीय उपखंडाचं तापमान प्रचंड वाढेल आणि लाखो लोकांचा मृत्यू होईल असा अंदाज या संशोधनात वर्तवण्यात आला आहे. कर्कवृत्ताच्या जवळ असल्यामुळे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि पाकिस्तानातील कराचीला या उष्ण हवांचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता आहे. तापमान वाढीची गती पाहता २०३० पर्यंत जगाचं तापमान दीड अंशाने वाढेल आणि त्यानंतर भारतात जगणे कठीण होणार आहे.

वाढत्या तापमानासोबत गरीबीचं संकट

तापमान वाढीमुळे नद्या लवकर आटतील. तसंच याचा पीकपद्धतीवरही परिणाम होईल. यामुळे भारतामध्ये अन्नधान्याची आणि पाण्याची भीषण टंचाई निर्माण होईल,महागाई वाढेल पण शेतकऱ्यांपासून नोकरदारांपर्यंत कोणाचेच उत्पन्न त्या तुलनेत वाढणार नाही. परिणामी भारतात गरिबीचं प्रमाण कैक पटींनी वाढेल असा अंदाजही या संशोधनात वर्तवण्यात आला आहे. नजीकच्या भविष्यात येऊन ठेपलेल्या या संकटाला भारत कसा सामोरा जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत