भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आज रेपो दरात आणखी पाव टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात आणखी पाव टक्क्यांनी वाढ करत तो ६.५० टक्क्यांवर आणला आहे. पतधोरण समितीच्या बैठकीनंतर याबाबतची घोषणा आरबीआयचे गर्व्हनर ऊर्जित पटेल यांनी केली.

वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने आरबीआयने तटस्थ भूमिका घेत पतधोरण जाहीर केले आहे. ऑक्टोबर २०१३ नंतर प्रथमच आरबीआयने सलग दोनवेळा रेपो दरात वाढ केली आहे.
जूनमध्ये रेपो दर ६ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर नेला होता. आता पुन्हा त्यात पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे कर्जे महागणार असून मासिक हप्त्याचा ज्यादा भार कर्जदाराला सोसावा लागणार आहे. महागाई वाढल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसतो. या पार्श्वभूमीवर महागाई नियंत्रणाचा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चालू आर्थिक वर्षात देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) दर ७.४ टक्के राहणार असल्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत जीडीपी ७.५-७.६ टक्क्यांवर जाईल, असेही संकेत दिले आहेत.

किरकोळ महागाईचा दर (सीपीआय) जूननंतर सलग तिसऱ्या महिन्यातही वाढला आहे. अन्नधान्य महागाईचा दर स्थिर आहे. मात्र अन्य वस्तूंचा महागाई दर वाढला असल्याची दखल पतधोरण समितीने घेतली आहे, अशी माहिती आरबीआयचे गर्व्हनर ऊर्जित पटेल यांनी दिली.

दरम्यान, रेपो दर वाढविणे अपेक्षित होते, असे एसबीआयच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे. याआधीच एसबीआयने कायम ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत