भारत महिलांसाठी असुरक्षित; जया बच्चन यांचा सरकारवर हल्ला

नवी दिल्ली :रायगड माझा वृत्त 

महिलांवर होणाऱ्या अत्याचारावरून समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भारत आता जगामध्ये महिलांसाठी असुरक्षित देश बनत आहे. त्यावर सरकारचं काय म्हणणं आहे?, असा संतप्त सवाल करत जया बच्चन यांनी आज सरकारला धारेवर धरले.

राज्यसभेत आज कठुआ प्रकरणावर खडाजंगी चर्चा झाली. या चर्चेत भाग घेताना जया बच्चन यांनी सरकारला महिलांवरील अत्याचाराच्या प्रश्नावरून अक्षरश: धारेवर धरले. ‘तुम्ही मध्यप्रदेशच्या घटनांवर बोलता. पण कठुआवर का बोलत नाही?,’ असा सवाल जया बच्चन यांनी केला. यावेळी त्यांनी ‘रॉयटर्स’च्या अहवालाचा हवालाही दिला. या आंतरराष्ट्रीय संघटनेने दिलेले अत्याचाराचे आकडे आणि तुमचे आकडे वेगळे कसे?, असा सवालही त्यांनी बाल विकास राज्यमंत्री वीरेंद्र कुमार यांना केला. यावेळी विरोधकांनी बच्चन यांच्या भूमिकेचं समर्थन केलं.

काँग्रेसच्या खासदार छाया वर्मा यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना वीरेंद्र कुमार यांनी महिलांसाठीचे कायदे अध्यादेशाद्वारे कठोर केल्याचं सांगितलं. पोलीस आणि कायदा सुव्यवस्था ही राज्यांची जबाबदारी आहे. मध्यप्रदेशसारख्या इतर राज्यांनी त्यावर चांगलं काम केलं आहे, असं वीरेंद्र कुमार म्हणाले. त्यामुळे जया बच्चन भडकल्या आणि त्यांनी महिलांसाठी आपला देश असुरक्षित बनत चालल्याचा हल्ला सरकारवर चढवला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.