भावपूर्ण वातावरणात शहीद प्रथमेश कदम अनंतात विलीन

भारतीय लष्कराची आणि महाराष्ट्र पोलिसांची मानवंदना

महाड : मयुरी खोपकर

शहीद जवान प्रथमेश दिलीप कदम याच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात शेवते येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतमातेच्या या वीरपुत्राच्या पार्थिवाला भारतीय लष्कराच्या भोपाळ युनिटने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली तर महाराष्ट्र पोलीस दलानेही प्रथमेशच्या पार्थिवाला सलामी दिली.

१२ मे रोजी भोपाळ येथे झालेल्या एका रेल्वे अपघातात बचाव कार्यादरम्यान अपघाताचे पुरावे गोळा करताना उच्च दाब वीज वाहिनीचा स्फोट होऊन त्यात प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी १५ मे रोजी त्याचा मृत्यु झाला.आज त्याचे पार्थिव शेवते येथे आणण्यात आले होते. काही काळ प्रथमेशच्या घराच्या अंगणात त्याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर हजारोंच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढण्यात आली. तिरंग्यात गुंडाळलेले पार्थिव चितेवर ठेवल्यानंतर प्रथमेश कदम अमर रहे च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. अनेकांना यावेळेस भावनांचा वेग आवरता आला नाही. यावेळी शहीद प्रथमेशला अखेरचा निरोप देण्यासाठी आ. भरत गोगावले , माजी आमदार माणिक जगताप , तहसिलदार चंद्रसेन पवार यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत