भावी डॉक्‍टर तरुणीवर नातलगाचाच अत्याचार

ठाणे : रायगड माझा ऑनलाईन 

“बीएएमएस’चे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला नात्यातीलच एकाने लग्नासाठी पिच्छा पुरवत सोशल मीडियावर तिचे आक्षेपार्ह फोटो टाकण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच पीडित तरुणीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून बदनामीदेखील केली. या प्रकरणात मुंब्रा रेतीबंद (जि. ठाणे) येथील तरुणाविरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली आठ डिसेंबरला गुन्ह्याची नोंद झाली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नितीन नारायण वाहुळे असे संशयिताचे नाव आहे. तो नोकरी करीत असून, त्याची शहरातील नातलग व पीडित तरुणीशी वर्ष 2014 पासून ओळख आहे. याचाच आधार घेत त्याने तरुणीकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला. यासाठी ओळख अधिक घनिष्ठ करून त्याने तिचे फोटोही काढले. ते फोटो फेसबुकवर अपलोड करून समाजात बदनामी करेल, अशी धमकी त्याने दिली.

यामुळे पीडित तरुणी भेदरली. याचाच गैरफायदा घेत संशयित वाहुळेने तिच्यावर ठाणे जिल्ह्यातील खारेगाव तसेच शहरातील पैठणगेट भागात अत्याचार केला. त्यानंतर फेसबुकवर तिच्या नावाने बनावट अकाऊंट उघडले. त्यावर अश्‍लील मजकूर पोस्ट केला. त्यापाठोपाठ व्हॉट्‌सऍपवरही महिलेबाबत अश्‍लील मजकूर शेअर केला.

आत्महत्येचीही दिली धमकी 
लग्नासाठी पिच्छा पुरवताना संशयित वाहुळे पीडितेला येणकेन कारणाने धमकावीत होता. दुसऱ्याशी लग्न केल्यास आत्महत्या करण्याचीदेखील त्याने धमकी दिली होती. या प्रकाराने त्रस्त तरुणीने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, संशयिताविरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद झाली. पुढील तपास पोलिस निरीक्षक नाथा जाधव करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत