भिवंडीतील टोरंट पावर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा

भिवंडी : रायगड माझा वृत्त 

भिवंडी शहर व ग्रामीण भागात वीज वितरण करणाऱ्या टोरंट पावर कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दंड थोपटले असून कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात टोरंट पावर कंपनीच्या अंजुरफाटा कार्यालयावर शुक्रवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भिवंडी शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे.

भिवंडी मनपाच्या मुख्य कार्यालयाजवळील धर्मवीर आनंद दिघे चौक ते टोरंट पावरच्या अंजुरफाटा कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. या मोर्चात शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत नागरिकांना केले आहे.

भिवंडीत वीज वितरण, दुरुस्ती देखभाल व बिल वसूल करण्याचा ठेका मागील १२ वर्षांपासून टोरंट पावर कंपनीने घेतला आहे. मात्र कंपनीने शासनाचे वीज वितरण अधिकारी, पोलीस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना हाताशी धरून नागरीकांना वेठीस धरण्याचे काम केले आहे असा जाहीर आरोप यावेळी राष्ट्रवादीचे खालिद गुड्डू यांनी पत्रकार परिषदेत केला.

भिवंडी पोलीस प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारल्याने पोलीस प्रशासन टोरंट पावरच्या दावणीला बांधले आहे असा थेट आरोप देखील त्यांनी यावेळी केला. शुक्रवारी मोर्चाचे आयोजन केल्याने पोलीस परवानगी देत नसल्याने पोलिसांच्या या अडवणुकीविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यासंदर्भातील निकाल गुरुवारी लागणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान याआधीदेखील भिवंडीत अनेक मोर्चे आंदोलने शुक्रवारी झाली त्या मोर्चाला व आंदोलनांना भिवंडी पोलीस प्रशासनाने कशी परवानगी दिली असा सवाल देखील त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला केला आहे.

नागरिकांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात आला असून टोरंट पावरने नागरिकांवर केलेल्या खोट्या केसेस तत्काळ मागे घ्याव्यात , टोरंट पावरचे मीटर जास्त वेगाने रिडींग देत असल्याने नागरिकांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे मान्यता प्राप्त मीटर बसविण्याची परवानगी दयावी, वीज चोरीच्या खोट्या केसेस करून नागरिकांकडून बेकायदेशीरपणे केली जाणारी अवाढव्य रकमेची आकारणी त्वरित बंद करावी, नागरिकांना देण्यात येणारी अपमानास्पद वागणूक थांबविण्यात यावी, वीज वसूल करण्यासाठी पोलीस व सुरक्षा कर्मींकडून वापरण्यात येणारी दंडेलशाही बंद करावी, कोणतीही नोटीस अथवा पूर्व कल्पना न देता विद्युत पुरवठा खंडित करण्याची कार्यप्रणाली बंद करण्यात यावी , अवाजवी युनिट रेट कमी करून शासन निर्णयाप्रमाणे युनिट रेट ची आकारणी करण्यात यावी या व अशा अनेक मागण्यांसाठी या मोरच्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांनी दिली आहे .

दरम्यान “जो पर्यंत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे जबाबदार अधिकारी मोर्च्या प्रसंगी येऊन लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत मोर्चा स्थगित करणार नाही ” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांनी दिली आहे .

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत