भिवंडीमधील शिक्षक भरतीसाठी पंचायत समिती सभापती उपोषणाच्या पवित्र्यात

भिवंडी : रायगड माझा वृत्त 

इंग्रजी शाळांमधील प्रवेशाच्या वाढत्या प्रवाहामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील मराठी शाळांच्या पटसंख्या मोठ्या प्रमाणात घसरत असल्याचे चित्र सध्या राज्यभर दिसत आहे. मराठी शाळांचा दर्जा सुधारावा, यासाठी शासन एकीकडे प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. अपुऱ्या शिक्षकांमुळे भिवंडीतील अनेक शाळांना टाळे लावण्याचा प्रकार स्थानिक नागरिकांकडून घडला असल्याने तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे .

दरम्यान 15 दिवसांच्या आत भिवंडी तालुक्यातील शिक्षकांची रिक्त पदे न भरल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा भिवंडी पंचायत समितीच्या सभापती रविना रवींद्र जाधव यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे . पंचायत समितीच्या सभापतींनीच थेट उपोषण आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने सभापतींच्या या मागणीची मुख्य कार्यकारी अधिकारी दखल घेतील का? याकडे तालुक्यातील हजारो विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे .

भिवंडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 308 मराठी शाळा असून या शाळांमध्ये एकूण मुख्याध्यापकांची 54 पदे मंजूर असून फक्त 33 पदे भरलेली आहेत तर मुख्यध्यापकांची 21 रिक्त आहेत. सहशिक्षकांची 868 पदे मंजूर असून त्यापैकी 823 पदे भरली असून सहशिक्षकांची 45 पदे रिक्त आहेत तर विज्ञान विभागाच्या पदवीधर शिक्षकांची 73 पदे मंजूर असून त्यापैकी फक्त 7 पदे भरली असून 66 रिक्त आहेत.

शिक्षकांच्या या रिक्त पदांमुळे तालुक्यातील शिक्षण विभागावर मोठा ताण वाढला असून एकाच शिक्षकाला तीन किंवा चार वर्ग हाताळावे लागत आहेत. त्यातच अनेक शिक्षकांच्या वैद्यकीय रजा, हक्क रजा, व इतर अडचणींमुळे शिक्षक हजर राहिले नाही तर अनेक ठिकाणी शिक्षकांअभावी शाळा बंद करण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालक वर्ग चिंतेत सापडला आहे . मराठी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांची भरती करून विद्यार्थी व पालकांची हि अडचण दूर करण्यासाठी भिवंडी तालुक्यात शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती करण्यात यावी अशी मागणी भिवंडी पंचायत समितीच्या सभापती रविना रवींद्र जाधव यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांच्यासह ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव , जि प उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती , जिप प्राथमिक विभागाच्या शिक्षणअधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

दरम्यान १५ दिवसांच्या आत आपल्या मागणीची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली नाही तर उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील सभापती रविना जाधव यांनी दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत