भिवपुरी येथील डायमंड रेसिडेंसीमध्ये बिल्डरकडून फसवणूक; सदनिका धारकांचा आक्रोश

कर्जत : अजय गायकवाड

परवडणाऱ्या घरांच्या जाहिरातींना भुलून अनेकांनी आपल्या स्वप्नातील घरासाठी कर्जतला पसंती दिली आहे. यातूनच कर्जत तालुक्यात अनेक गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. पण आता याच बिल्डरांकडून फसवणुकीचे अनेक प्रकार झाल्याच्या घटना समोर येत आहेत. भिवपुरी स्टेशनला लागून उभे रहात असलेल्या डायमंड रेसिडेन्सी या गृहनिर्माण प्रकल्पात बिल्डरकडून फसवणूक झाल्याचा येथील रहिवाश्यांच्या आरोप आहे.

रस्त्याने जोडलेले, रेल्वेची सुविधा असलेला भाग म्हणून भिवपुरी भागात अनेक गृहनिर्माण प्रकल्प सुरु झाले. आकर्षक जाहिराती करून बिल्डरांनी गरजू नागरिकांना या भागात घर खरेदीसाठी आकर्षित केले. याच भागात रेल्वे स्टेशनला लागून विजय डेव्हलपर्स या कंपनीने दहा इमारतीचे एक रहिवासी संकुल उभारणीचे काम सुरु केले. २२० सदनिका आणि दहा इमारती असे संकुल उभारले जात असल्याची जाहिरात करण्यात आली. यावेळी क्लब हाऊस, रहदारीचा रस्ता, स्विमिंग पूल अशा अनेक सुविधा बिल्डरने देऊ केल्या होत्या. पण आता या बिल्डरचा फोलपणा उघड झाला आहे.

इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. क्लब हाऊस फक्त कागदावर आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. इमारतीकडे येण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामपंचायतीची कचरा गोळा करणारी गाडी इमारती मध्ये येत नाही, संकुलाच्या आवारात लाईट नाही. किमान सुविधांसाठी बिल्डरकडे तगादा लावूनही बिल्डर दाद द्यायला तयार नाही. स्वप्नातील घर घेणाऱ्या अनेकांच्या वाट्याला इथे फसवणूक आली आहे. लिफ्ट असो कि मुलांना खेळण्यासाठी उद्यान असो सर्वच बाबतीत इथे फसवणूक झाली आहे. कर्जत तालुक्यात बिल्डरांकडून अशी फसवणूक होत असताना महसूल विभाग पोलीस खाते आणि सर्वच शासकीय यंत्रणा या बिल्डरांना पाठीशी घालण्याची भूमिका घेत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या विजय डेव्हलपर्स असो कि अन्य बिल्डर यांच्यावर प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.

गृहसंकुलाचे नाव डायमंड जरी असले तरी या संकुलात बिल्डरने काहीच तसे केले नाही, जाहिरातीमध्ये ज्या सुविधा दाखवल्या होत्या त्या सुविधा आम्हा सदनिका धारकांना मिळालेल्या नाहीत. बिल्डर आमची फसवणूक केली आहे.

पल्लवी शिंदे, सदनिकाधारक      

 

बिल्डरने संकुलाच्या पार्किंगच्या जागेवर गृह संकुलाचे कार्यलय उभारले आहे. स्विमिंग पूलची सुविधा देण्यात येईल असे सांगण्यात आले होते मात्र 200 हून अधिक सदनिका धारकांसाठी छोटा स्विमिंग पूल दिला आहे. येण्या जाण्यासाठी रस्ता देखील अधिकृत नाही.

राहुल मोरे, सदनिकाधारक

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत