भुजबळ इफेक्‍ट; अजिंक्य गितेंसह भाजपचे पाच नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश

नाशिक :रायगड माझा 

भारतीय जनता पक्षाच्या पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 ऑगस्टला हे सर्व पदाधिकारी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली जाईल. हा पक्ष प्रवेश रोखण्यासाठी भाजपचे नेते काय भूमिका घेतात काय याची उत्सुकता आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष अजिंक्‍य गिते यांसह बाळा निगळ, निवृत्ती इंगोले, जय कोतवाल, धनाजी लगड, आकाश तेजाळे हे प्रमुख पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांची नुकतीच बैठक झाली. यावेळी बहुतांश पदाधिकाऱ्यांनी भाजपकडून न्याय व काम करण्याची संधी मिळत नाही अशी तक्रार केली. काम करणाऱ्यांवर अन्याय होतो अशी सगळ्यांचीच भावना असल्याने कोंडमारा होतो अशी खंत व्यक्त करण्यात आली. त्यासाठी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात येईल. याबाबत राष्ट्रवादी काँग्रसेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला आहे. येत्या 1 ऑगष्टला शहरात मोठा कार्यक्रमात पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात येईल. यावेळी शक्ती प्रदर्शन करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी लवकरच समर्थकांची बैठक घेण्यात येणार आहे.

विधानसभा, महापालिका निवडणुकांत भाजपने शहरात लक्षणीय कामगिरी केली होती. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आलेल्या या पदाधिकाऱ्यांचा मोठा वाटा होता. हे सर्व माजी आमदार वसंत गिते यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला हा मोठा धक्का मानला जातो. नुकतीच माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजुर झाल्यावर त्यांचे शहरात मोठे स्वागत झाले होते. त्याचे राजकीय परिणाम काय होतात, याची चर्चा होती. आता भाजपचे प्रमुख पदाधिकारी पक्षाला रामराम ठोकणार असल्याने राजकीयदृष्ट्या हा पक्षप्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत