भुजबळ विरुद्ध पालकमंत्री संघर्ष उभारण्याचा प्रयत्न

नाशिक : रायगड माझा वृत्त

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये वाक्‌युद्ध पेटले आहे. त्यात ज्येष्ठांनी उडी घेतली नसली तरीही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात संघर्ष उभा करण्यासाठी दोन्ही पक्षांची तरुणाई  पत्रकबाजीतून पुढे सरसावली आहे.

पालकमंत्र्यांनी, पक्षाने जबाबदारी दिल्यास ‘बारामतीत’ विजय मिळवून दाखवेन, असे वक्तव्य केले. या वक्तव्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी, ‘बारामतीत डिपॉझिट वाचवा अन्‌ कोटींचे बक्षीस मिळवा!’ असे आव्हान दिले होते. या आव्हानाला आज भाजप विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष ऋषिकेश आहेर यांच्या नावाने प्रतिआव्हान देण्यात आले. पत्रकात राष्ट्रवादीच्या पायाखालील वाळू सरकली असल्याची टीका केली आहे. पालकमंत्र्यांच्या नियोजन कौशल्याचा धसका बारामतीकरांनी घेतला असून, नाशिकमधील त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी चिंताग्रस्त झाल्याचे दिसते. एवढेच नव्हे, तर पालकमंत्र्यांवर निधी गोळा केल्याचा आरोप करणाऱ्यांनी एक कोटींची पैज लावून संस्कृतीचे ओंगळवाणे प्रदर्शन केले. हीच राष्ट्रवादीची सभ्यता आणि संस्कृती का? अशी टिप्पणी पत्रकात केली आहे.

फिरणाऱ्याचे ‘प्रताप’ सुरू
गुंतवणूकदारांना टोपी घालून उखळ पांढरे करणाऱ्या संशयिताना वैद्यकीय इलाजासाठी दाखल करणाऱ्या कथित सहभागीदाराचे बिंग फुटले होते. त्या वेळी पालकमंत्र्यांचा सोशल मीडियातून बराच उल्लेख झाला. मग पालकमंत्र्यांनी ‘त्याच्या’शी आपला काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा दिला. आता तो पुन्हा पालकमंत्र्यांच्यासमवेत फिरत असून, ‘त्याने’ आपले ‘प्रताप’ दाखविण्यास सुरवात केली. पालकमंत्र्यांसमवेतच्या कार्यक्रमांमधून चमकल्यानंतर आता श्री. भुजबळ यांच्यावर मराठा द्वेषी असल्याचा आरोप करून त्याची माहिती सोशल मीडियामधून पोस्ट केली. त्यास जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस योगेश निसाळ यांनी प्रतिउत्तर दिले. ‘भाजपच्या फुटकळ दलालांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये’, असा निर्वाणीचा इशारा देत प्रसिद्धीसाठी चाललेल्या पत्रकबाजीचा निषेध केला आहे.

भाजपच्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची
पालकमंत्र्यांसमवेत जवळीक करत स्थानिक पातळीवर उपद्रव वाढल्यावर भाजपच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतली होती. पालकमंत्र्यांना ‘त्याच्या’शी आपला काहीही संबंध नाही, असे पत्रक काढावे लागण्यामागे ही भूमिका कारणीभूत ठरली. आता परत उपद्रव मूल्याचे ‘पहिले पाढे पंच्चावन्न’ सुरू झाल्याने भाजपचे नेते काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत