भुसावळमध्ये खडसे समर्थकांचा दानवेंना घेराव

जळगाव  : रायगड माझा वृत्त

जळगाव तसेच रावेर लोकसभा निवडणुकीचा पक्षीय आढावा घेण्यासाठी जळगाव दौऱ्यावर आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना खडसे समर्थकांनी घेराव घालत नाथाभाऊंवर अन्याय का? त्यांचे पुनर्वसन कधी होणार? जळगाव जिल्ह्याला पूर्णवेळ पालकमंत्री मिळतील का? कुणाच्या मार्गदर्शनात लोकसभा निवडणुकीचे काम करायचे? अशा प्रश्नांच्या फैरी झाडत रोष व्यक्त केला. त्यावर दानवे यांनी लवकरच निणय घेऊ असे म्हणत वेळ मारुन नेली.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज शनिवारी रावेर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी भुसावळ येथील आयएमए सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर खडसे समर्थकांनी रावसाहेब दानवे यांना घेराव घालत खडसेंच्या पुनर्वसनाबाबत विचारणा केली. त्यावर बोलताना दानवे म्हणाले की, राज्याच्या राजकारणात दीर्घकाळापासून कुठलेही फेरबदल झालेले नाहीत. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्याबद्दल पक्षाला वेगळा निर्णय घेता आला नाही. ज्यावेळी फेरबदल होतील, तेव्हा निश्चितच खडसेंबद्दल पक्षाकडून योग्य निर्णय घेतला जाईल, असे सांगत वेळ मारुन नेत तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे खडसे समर्थक कमालीचे नाराज झाले होते.

दोषी की निर्दोष ते कळू द्या! 

गेल्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत कोणतेही आरोप माझ्यावर झालेले नाहीत. परंतु कोणाच्यातरी सांगण्यावरुन माझ्यावर आरोप झाले आणि त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला. नाथाभाऊ दोषी आहेत की, निर्दोष एवढेच महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्यावे अशी भावना यावेळी आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

समस्या कोल्हापूरला जाऊन सांगू का?

खडसे समर्थकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबतही दानवेंना विचारणा केली. जिल्ह्यासाठी पूर्णवेळ पालकमंत्री नाही. पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे चंद्रकांत पाटील हे महिन्यातून एकदा हजेरी लावतात. त्यामुळे जिल्ह्याचा विकास थांबला आहे. कार्यकर्त्यांनी कोल्हापूरला जाऊन अडचणी सांगाव्यात का?, अशा शब्दांत खडसे समर्थकांनी आपली नाराजी दानवे यांच्याकडे व्यक्त केली.

गिरीश महाजन यांची अनुपस्थिती

रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन मात्र उपस्थित नव्हते. त्यांची अनुपस्थिती रावेर मतदार संघात चर्चेचा विषय ठरली. भुसावळातील आयएमए सभागृहात ही बैठक झाली. नियोजित वेळेपेक्षा ही बैठक तब्बल पावणेदोन तास उशिराने सुरू झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, संघटन मंत्री विजयराव पुराणिक, माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर आदी उपस्थित होते. बैठकीस जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन अनुपस्थित होते. आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीसाठी रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व बुथ प्रमुखांना निमंत्रित करून त्यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली. बूथ प्रमुखांशी चर्चा करताना पक्षश्रेष्ठींनी बुथस्तरावरील कामाचा आढावा घेतला. तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटना बळकट व्हावी म्हणून काही सूचना देखील केल्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत