मंत्रालयासमोर महिलेचा अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास केला. मात्र, तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. चेंबूर येथील वाशीनाका समता चाळीतील दीपाली खंडू भोसले असे या महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक समस्या तसेच त्या भागातील काही गावगुंड त्रास देत असून, स्थानिक पोलिस कारवाई करीत नसल्याच्या निषेधार्थ भोसले यांनी हे कृत्य केल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.


अलीकडच्या काळात मंत्रालयात अथवा मंत्रालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयाच्या मुख्य वास्तूत मंत्रालयाच्या वरच्या माळ्यावरून कोणी उडी मारू नये यासाठी मंत्रालयाच्या मुख्य वास्तूत आतल्या बाजूने संरक्षक जाळी लावण्यात आलेल्या आहेत. स्थानिक ठिकाणी प्रश्न सुटत नसल्यामुळे त्रस्त मंडळी थेट मंत्रालय गाठतात आणि आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतात, असे एका अधिकाऱ्याने खासगीत सांगितले.

चेंबूर परिसरात राहणाऱ्या भोसले यांना स्थानिक गावगुंड प्रवृत्तीच्या मोहमद सय्यद अन्सारी आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांकडून त्रास दिला जात असल्याची त्यांची तक्रार आहे. या प्रकाराच्या विरोधात चेंबूरच्या आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार करूनही आरोपींवर कारवाई होत नाही. पोलिस आरोपीस पाठीशी घालत आहेत, असा आरोप दीपाली भोसले यांनी केला आहे. लग्न होऊनही पती तिच्यासोबत राहत नसल्याची त्यांची तक्रार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

स्थानिक पोलिस दाद देत नाहीत. त्यामुळे आपल्याला मंत्रालयात गृह विभागात न्याय मिळेल या आशेने ही महिला मंत्रालयात येण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र तिला मंत्रालयात प्रवेश न मिळाल्यामुळे मुख्य प्रवेशद्वारासमोरच तिने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मंत्रालयातील पोलिसांनी दिली.

दरम्यान, या महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतु तिला अचानक घेरी येवून खाली कोसळल्याने तिला पोलिसांनी तातडीने जी. टी. रुग्णालयात नेल्याचे समजते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत