मंत्रिमंडळाच्या विस्तारात ‘या’ मंत्र्यांना मिळणार नारळ!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळालाय. येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी म्हणजे 12 किंवा13 ऑक्टोबरला हा विस्तार होणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिलीय. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार होणार म्हणून बोललं जात होतं. अनेक तारखाही जाहीर होत होत्या मात्र मुख्यमंत्र्यांनी निर्णय काही घेत नव्हते. नवरात्रीच्या मुहूर्तावर होणारा हा देवेंद्र फडणवीस सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असेल. या विस्तारात नव्या कुणाचा समावेश होणार आणि कुणाला डच्चू मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे. तर औरंगाबादमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी लवकरच विस्तार होईल मात्र केव्हा ते मात्र सांगितलं नाही.

राज्य मंत्री परिषदेची आणि भाजप आमदार-खासदारांच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार हे नक्की समजलं जात होतं. सध्या मंत्रिमंडळात भाजप कोट्याच्या चार जागा खाली आहेत. तर शिवसेनेच्या कोट्यातल्या सर्व जागा भरलेल्या आहेत. मात्र शिवसेनेच्या कोट्यातले आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची विधान परिषदेची मुदत संपत आहे. त्यामुळं शिवसेनेकडे एक जागा राहू शकते. त्या जागेवर पुन्हा दीपक सावंत यांचीच निवड होती की शिवसेना नवं नाव सुचवतं याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत.

या मंत्र्यांची खुर्ची धोक्यात?

  • आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा
  • सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले
  • गृहराज्यमंत्री रणजित पाटील
  • उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे

विष्णू सावरा आणि राजकुमार बडोले यांच्या कामगिरीवर मुख्यमंत्री फारसे खूष नाहीत असं बोललं जातंय. तर रणजित पाटील आणि प्रविण पोटे यांना पक्षकार्यात मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि जेमतेम काही महिन्यांचा राहिलेला कालावधी यामुळं कामाचा झपाटा असलेले मंत्री मुख्यमंत्र्यांना पाहिजे आहेत. त्या सगळ्यांचा विचार करून नव्या माणसांची निवड मुख्यमंत्री करणार आहेत.

यांना संधी मिळण्याची शक्यता?

  • आमदार आशीष शेलार
  • आमदार संजय कुंटे
  • आमदार अनिल बोंडे
  • आमदार भाई गिरकर

भाजपमंध्ये मंत्रिपदासाठी जोरदार हालचाली सुरू आहे. सगळ्यात आघाडीवर नाव आहे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांचं. त्यांचं नाव याआधीही अनेकदा चर्चेत होतं. शेलार हे धडाडीचे आहेत आणि अमित शहांचा त्यांच्यावर विश्वासही आहे.

मात्र ते मुख्यमंत्र्यांच्या खास वर्तुळातले नाहीत असंही बोललं जातं. त्यामुळे यावेळी त्यांची वर्णी लागणार का याची सगळ्यांना उत्सुकता आहे.गेली चार वर्ष रखडलेल्या महामंडळांवर सरकारने नुकत्याच नियुक्त्या केल्यात. त्यामुळं या मंत्रिमंडळ विस्तारात आपला समावेश व्हावा यासाठी अनेक इच्छुक प्रयत्नशील आहेत.

मुख्यमंत्र्यांनी विस्ताराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केलेली आहेत. त्यामुळं हे नवे चेहेरे कोण असतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत