मतदारसंघ राखायचा असेल तर उमेदवार बदलून द्या – कल्याण पश्चिमेतील इच्छुक प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला

कल्याण : रायगड माझा वृत्त 

कल्याण पश्चिमेतील भाजप आमदार नरेंद्र पवार यांच्यासमोरील आव्हानं आणखीनच वाढताना दिसत असून ‘हा मतदारसंघ राखण्यासाठी आम्हाला उमेदवार बदलून पाहीजे’ असे साकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना घालण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेतील इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेत हे साकडे घातले.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघावरून आधीच भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. त्यातच विद्यमान आमदार पवार यांच्यापुढे स्वकीयांनीच शड्डू ठोकल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीसाठी विद्यमान आमदार यांच्यासह आणखी 10 जणांनीही उपस्थिती लावली होती. त्यामध्ये विद्यमान नगरसेवकांसह भाजपच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्याला काही दिवसही उलटले नाहीत तोच आता या इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी थेट मुंबई गाठत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. “कल्याण पश्चिम मतदारसंघातील नागरिकांमध्ये विद्यमान आमदार यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. पवार यांना पुन्हा उमेदवारी दिली गेल्यास लोकांच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामूळे पक्षश्रेष्ठींनी त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये. त्यांच्याऐवजी दुसऱ्या सक्षम उमेदवाराला निवडणुकीत उभे करावे” अशी मागणी केली. त्यावर आपण सर्व माहिती घेऊन याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान कल्याण पश्चिम मतदारसंघाबाबत भाजप पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील”- आमदार नरेंद्र पवार
तर याबाबत विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. गेल्या 5 वर्षांत आपण केंद्र असो की राज्य सरकारच्या योजना की पक्ष संघटनेचे काम हे सर्व अत्यंत प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहचवले आहे. त्यामूळे कोणाला उमेदवारी द्यायची यावर मी भाष्य करणे योग्य नसून पक्षश्रेष्ठी निश्चितच योग्य तो निर्णय घेतील.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत