मध्य प्रदेश, राजस्थानातून भाजपाचा सफाया अटळ – राहुल गांधी

मुंबई : रायगड माझा 

गुजरातमध्ये कसेबसे वाचले, कर्नाटकात हरले. आता मध्यप्रदेश व राजस्थानात तर भाजपाचा संपूर्ण सफाया होऊन विरोधकांची विजयी घौडदौड सुरू होईल, असा आत्मविश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी व्यक्त केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात आम्ही लढलो . पण त्यांचा सन्मान आम्ही नेहमीच जपला, असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला.
मुंबई काँग्रेसतर्फे गोरेगावात झालेल्या बुथ कार्यकर्ता संमेलनात खा. गांधी यांनी भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ते म्हणाले, स्वत:ला देशाचे चौकीदार म्हणवणारे पंतप्रधान मोदी प्रत्यक्षात १०-१५ बड्या उद्योगपतींचे चौकीदार आहेत. निरव मोदी, विजय मल्ल्या करोडो रुपये बुडवून पळाले, तेव्हा हे चौकीदार मूग गिळून बसून राहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते की केवळ त्यांच्या भाषणावरच देश चालला आहे. खोटे बोलून तुम्हाला सत्ता मिळेलही, पण बेरोजगारांना रोजगार कसा मिळणार? शेतकऱ्यांच्या धान्याला भाव कसा
मिळणार, असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

तुम्ही मात्र गुरूलाच विसरलात

तथाकथित संस्कृती रक्षणावरून राहुल यांनी मोदींना टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, अडवाणींच्या विरोधात आम्ही २००४ व २००९ मध्ये निवडणूक लढवली. त्यावेळी ते तुमचे गुरू होते. गुरुपेक्षा मोठे जगात काही नाही, मात्र तुम्ही सत्तेवर आलात आणि गुरुलाच विसरुन गेलात.

आम्ही नेहमीच अडवाणींचा सन्मान केला आहे. तुम्ही काय केले ते देशाने पाहिलेच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. वाजपेयी अ‍ॅडमिट झाल्याचे कळताच सर्वांत आधी मी तेथे धावलो, माझ्यानंतर कोण आले ते मी सांगत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
माजी न्या. ठिपसे काँग्रेसमध्ये : निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी खा. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ठिपसे यांनी सलमान खानची हिट अँड रन केस, बेस्ट बेकरी केस, साध्वी प्रज्ञासिंह केस यांसारखी प्रकरणे न्यायमूर्ती असताना हाताळली आहेत.
या संमेलनास प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पक्षाचे महासचिव अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आदी उपस्थित होते.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत