मनसेचे विमान शिवसेनेने पळवले!

खेड : रायगड माझा वृत्त 

निवडणुकीच्या काळात उमेदवारांची पळवापळवी करण्याचे प्रकार हल्ली सर्रास घडतात.  पण खेडचे मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी भरपूर खटपट करून मिळवलेले हवाई दलाचे विमानच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या कार्यकर्त्यांनी पळवण्याचा प्रकार घडला आहे.

संग्रहित छायाचित्र

या प्रकाराची पार्श्वभूमी अशी- खेड तालुक्यातील शिवतर गावातील हुतात्मांच्या बलिदानाचे स्मारक म्हणून हवाई दलाकडून जुने विमान मिळवण्यासाठी  खेडचे नगराध्यक्ष खेडेकर गेली सुमारे तीन वर्षे प्रयत्न करत  होते.

अखेर त्यांना यश येऊन भारतीय हवाई दलाकडून खेड नगर परिषदेला वायुसेनेच्या पूर्वीच्या वापरातील टीटीएल-एचपीटी ३२ हे लढाऊ विमान मंजूर झाले.  गेल्या  ८ जून रोजी हे  विमान खेडमध्ये आले. पण संबंधित मालवाहू  ट्रकचालकाची दिशाभूल करून पर्यावरण मंत्री कदम यांचे स्वीय सहाय्यक योगेश सदावत्रे यांनी ते कदम यांच्या संस्थेच्या योगिता दंत महाविद्यालयात नेऊन ठेवल्याचे उघड झाले आहे.

नगराध्यक्ष खेडेकर यांनी या संदर्भात सांगितले की, विमान मंजूर झाल्याचे संरक्षण विभागाकडून कळले होते. त्यानुसार शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात ते ठेवण्यासाठी आम्ही तयारीला लागलो. पण विमान पाठवल्याचे आम्हाला कळवण्यात आले नव्हते. दरम्यान गेल्या शुक्रवारी संरक्षण विभागाकडून   विचारणा झाली तेव्हा त्यांनी दिलेल्या माहितीवरून हा प्रकार उघडकीस आला आहे.

नगराध्यक्षांच्या कागदपत्रांच्या खोटय़ा झेरॉक्स प्रती दाखवून मंत्री कदम यांच्या निर्देशानुसार त्यांचे सहाय्यक सदावत्रे  यांनी परस्पर योगिता दंत महाविद्यालयात विमान नेऊन ठेवल्याचे उघड झाले आहे .  भारतीय हवाई दलाचे  लढाऊ विमान चोरणे ही गंभीर बाब असल्यामुळे सदावत्रे यांच्याविरूध्द खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत