मनिष लाड मृत्यूप्रकरणी दोघांचा शोध सुरू

रायगड माझा वृत्त 

सातारा: कास रोडवर असणाऱ्या गणेश खिंडीजवळील दरीत सापडलेला मृतदेह साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेत राहणाऱ्या मनिष शिवाजी लाड (वय 28 ) याचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. लाड याच्या मृत्यूच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला असुन दि. 14 रोजी तो दोघा जणा ंसमवेत फिरत असल्याचे व ते दोघे जण सध्या गायब असल्याची चर्चा सुरु आहे.

कास रोडवरील गणेश खिंडीजवळ असणाऱ्या दरीत एक मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानुसार सातारा तालुका पोलिसांनी मंगळवारी त्याठिकाणी जावून शोध मोहिम राबवली होती. शोधादरम्यान दरीच्या तळाशी असणारा मृतदेह पोलिसांनी ट्रेकर्सच्या मदतीने बाहेर काढला. सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु असतानाच पालिसांना सदर मृताशी मिळते जुळते वर्णन असणारा युवक बेपत्ता असल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाली. यानुसार तक्रार नोंदविणाऱ्यांना बोलावून घेत पोलिसांनी पडताळणी सुरु केली.

पडताळणीत दरीतील मृतदेह मनिष लाड याचाच असल्याचे नातेवाईकांनी ओळखले. रात्री उशिरा शवविच्छेदन केल्यानंतर मनिष याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, मनिष हा दि. 14 रोजी सकाळी घरातून बाहेर गेला होता. बाहेर गेलेला मनिष याच्यासोबत आणखी दोन युवक होते. सदर युवक सुध्दा शहरातून पसार झाले आहेत.पसार झालेले ते दोन कोण आहेत? ते कोठे आहेत? याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. बुधवारी दुपारी सातारा तालुका पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणीकरत पुरावे गोळा केले. याचा तपास उपनिरीक्षक जाधव हे करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत