मनुवाद संपविण्यासाठी फुलेंचे विचार गरजेचे: शरद पवार

पुणे : रायगड माझा वृत्त

मनुवाद संपविण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले विचार पुढे आणले पाहिजेत. देशात प्रतिगामी विचार रूजविण्याचा प्रयत्न होत आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार यांना समता पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, श्रीनिवास पाटील, छगन भुजबळ, देवीसिंग शेखावत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी शरद पवार म्हणाले, की सार्वजनिक जीवनात असताना मला अनेक पुरस्कार मिळाले, पण मला मिळालेला हा पुरस्कार विचारांचा समतेचा आहे. त्यामुळे हाच खरा सन्मान आहे. देशात सध्या प्रतिगामी विचार रुजविण्याच प्रयत्न होत आहे.

छगन भुजबळ म्हणाले, की मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण इतर घटकांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे. इतरांसारखीच भूमिका मी मांडतो, पण माझ्याविरोधात राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न होतो आहे. फुले वाडा हे उर्जा शक्ती आहे. पाठपुरावा करूनही राष्ट्रीय स्मारक होत नाही. हो म्हणतात पण काहीच करीत नाहीत. या कामासाठी आम्ही कोट्यवधी रूपये मागत नाही. काही प्रमाणात निधी देऊन स्मारक केले पाहिजे. हे काम लवकर होईल, अशी आशा आहे.

महात्मा फुलेंच्या कामात विचार, धडपड होती. महिलांच्या सन्मानासाठी फुलेंनी प्रचंड प्रयत्न केले, आपले संविधानाचे रक्षण करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. अशा जबाबदारीच्या विचारांना पुढे नेणारी व्यक्ती म्हणजे शरद पवार. पवार यांनी सर्वच क्षेत्रात भरीव काम केले आहे, असे प्रतिभाताई पाटील म्हणाल्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत