मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेत जाणार!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा एकदा अमेरिकेत जाणार आहेत. येत्या 24 तासांमध्ये पर्रिकर अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती आहे.

मुंबईमधील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन पर्रिकर बुधवारी गोव्यात परतणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले होते, मात्र आज ते गोव्यात न परतता पुढील उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार आहेत.

मुख्यमंत्री गेल्या बुधवारी सायंकाळीच अमेरिकेहून अकरा दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते. न्यूयॉर्कमधील स्लोन केटरींग स्मृती रुग्णालयात ते उपचार घेत होते. त्यांच्यासोबत गोव्याच्या सरकारी रुग्णालयाचे डॉक्टर कोलवाळकर हेही अमेरिकेला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी गोव्यात परतल्यानंतर विश्रांती घेणे अपेक्षित होते.

मात्र, त्यांनी विश्रांती घेतली नाही. गोव्यातील दाबोळी विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजप नेत्यांकडून हाती घेतला व ते गर्दीमध्ये बराचवेळ चालत आले. त्यानंतर ते गाडीने आपल्या निवासस्थानी निघून गेले. गुरुवारी सकाळी ते पर्वरी येथील मंत्रालयात आले नाहीत.

दुपारपर्यंत ते मंत्रालयात येतील असे अपेक्षित होते. मात्र दुपारीच त्यांना उलट्या सुरू झाल्या. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मुंबईतील रुग्णालयातील डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी त्यांना मुंबईला बोलावले. मग मुख्यमंत्री तातडीने त्यांच्या मुलासह मुंबईच्या रुग्णालयात दाखल झाले. काही महिन्यांपूर्वी लिलावती रुग्णालयातच पर्रीकर यांनी स्वादूपिंडाशीसंबंधित आजारावर आठवडाभर उपचार घेतले होते. त्यानंतर ते पुढील उपचारांसाठी अमेरिकेला गेले होते. आता पुन्हा एकदा ते उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत