मराठवाड्यातील दुष्काळाला नेटाने सामोरे जाऊया: पालकमंत्री रामदास कदम

नांदेड : रायगड माझा ऑनलाईन 

मराठवाड्यात पडलेला दुष्काळ हा भयावह असून पक्षीय राजकारण न करता या दुष्काळाचा सामना करूया, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी येथे केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण झाल्यानंतर ते बोलत होते.

पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर 69 व्या हिंदुस्थानच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रामदास कदम बोलत होते. प्रारंभी तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधिक्षक संजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, अपर पोलीस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे यांची उपस्थिती होती. परेड कमांडर अश्विनी शेंडगे यांच्या नेतृत्वात तिरंग्याला सलामी देण्यात आली.

याप्रसंगी पुढे बोलतांना रामदास कदम म्हणाले, सध्या मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघाला आहे पण दुष्काळाचे राजकारण न करता आम्ही सर्व राजकीय पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून दुष्काळातील प्रत्येक त्रासलेल्या माणसाला मदत करण्यासाठी एकत्रीत काम करू. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि सर्व देशवासीयांवर अनंत उपकार केले. त्यांच्यामुळेच आज रामदास कदम सुध्दा पालकमंत्री, लोकप्रतिनिधी होवू शकला असे सर्व अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहेत.

आजही राज्यात कर्नाटकमधील कांही भाग एकत्र करुन संयुक्त महाराष्ट्र उभा राहावा यासाठी आंदोलन होते आहे. आजही जातीय दंगली होत आहेत याचे दु:ख व्यक्त केले. विविध जाती, विविध धर्म आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर येत आहेत. पण आम्ही सर्व एका रक्तामासाचे आहोत, एकमेकांसाठी आहोत या भावनेसह आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याच्या मनात रुजण्याची गरज रामदास कदम यांनी सांगितली. महात्मा गांधींनी पाहिलेले स्वप्न आजही पुर्ण झाले नाही हे सांगतांना देशातील सर्वसामान्य माणसाच्या अंगावर लाज झाकण्या इतपत कपडा मी उपलब्ध करणार नाही तो पर्यंत मी स्वत:ही शरीरभर कपडे घालणार नाही यावरून आपल्याला सुध्दा याची गरज असल्याचे सांगितले. त्या महात्मा गांधींच्या शब्दांवर आम्ही सुध्दा काम करण्याची गरज आहे, असे रामदास कदम म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी पोटावर जातीचे लेबल लावू नका कारण पोट कोणत्याही जातीचे असो ते भरणे आवश्यक आहे असा संदेश दिलेला आहे. त्याची आठवण करत रामदास कदम यांनी आपण सर्व जण जातीचे लेबल न लावता पोट कसे भरेल ते कोणतेही असो यावर काम करू असे सांगितले.

या परेडमध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा बल, राज्य राखीव सुरक्षा बल, पोलीस, महिला पोलीस, वाहतूक पोलीस, एनसीसी, स्काऊट गाईड, श्वान पथक, विविध विभागांचे रथ समाविष्ट करण्यात आले होते. पोलीस कवायत मैदानावर जनता, शाळा महाविद्यालय याती विद्यार्थी शिक्षक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत