मराठा आंदोलन : संरक्षण नसेल तर वाळूजचे उद्योजक कारखाने अन्यत्र हलविणार!

औरगाबाद  : रायगड माझा वृत्त 

उद्योग जातपात न पाहता केवळ क्षमता पाहून नोकऱ्या देतात. उद्योग क्षेत्रात मोठा रोजगार स्थानिक युवकांना  मिळतो . अश्या परिस्थितीमध्ये उद्योगांवर हल्ले होतात आणि त्यावेळी सरकार संरक्षण देऊ शकणार नसेल तर आपल्या गुंतवणुक इथून हलवण्याचा विचार करावा लागेल असा इशारा शहरातील उद्योजकांनी दिला. 

मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी (ता. 9) पुकारण्यात आलेल्या बंद दिनी वाळूज औद्योगिक वसाहतीत तब्बल साठ कंपन्यांवर भयावह हल्ला झाला असल्याची माहिती मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स  अँड अग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी दिली.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सीमेन्स, इंडयुरन्स, व्हेरॉक, नहार इन्फोटेक, आकांक्षा पॅकेजिंग, एनआरबी, शिंडलेर, कॅनपॅक सारख्या मल्टिनॅशनल  कंपन्या हिंसाचाराच्या  बळी  ठरल्या आहेत . अनेक कंपन्यांमध्ये घुसलेले टोळके तोडफोड आणि नमारहाण करीत होते . त्यांचे वर्तन दहशत निर्माण करणारे   होते. काही कंपन्यांतील स्टाफ गच्चीवर लपला म्हणून जीवित हानी टळली, असे प्रसाद कोकीळ यांनी सांगितले.

गुरुवारी रात्री उशिरा औद्योगिक संघटनानी तातडीने पत्रकार परिषद घेत या हल्ल्याचा निषेध केला आहे. प्रत्येकवेळी उद्योगांना सॉफ्ट टार्गेट केले जाते, दरवेळी उद्योग बंद ठेवणे शक्य नसते. उद्योगांचे होणारे असले नुकसान आता सहनशीलतेपुढे गेले आहे.येथील उद्योगांनी आजपर्यंत कोणतीही भीक मागितली नाही, मागणार नाही.  पण आता आम्ही अन्यत्र उद्योग हलविण्याचा विचार करू असे काही उद्योजक म्हणाले . 

हल्ले होत असताना पोलिसांना फोन केले गेले. अनेक ठिकाणी पोलीस तासाभराने पोचले. आलेले पोलिसही कोणतीच सुरक्षा देऊ शकले नाहीत. आयुक्त आले असले तरी घटना घडल्यावर सूत्रे हलली तर उपयोग काय?  असा सवाल यावेळी करण्यात आला.

सरकारने नोकऱ्या दिल्या तरी त्या मर्यादितच असतील, उद्योग मोठ्या  प्रमाणात रोजगार निर्मिती करते, आणि अश्या प्रकारे नोकऱ्या देणाऱ्या लोकांना लक्ष्य करून जात असेल तर गुंतवणूक आणायची, करायची की नाही. नवीन गुंतवणूक आणण्यासाठी भांडावे की नाही हा विचार गांभीर्याने करावा लागेल असा इशारा एनआयपीएमचे उपाध्यक्ष सतीश देशपांडे यांनी दिला.

या वसाहतीतील काही कंपन्या  भीतीदायक वातावरणामुळे शुक्रवारी बंद ठेवण्यात आल्या  आहेत. यावेळी कामलेश धूत, मसीआ अध्यक्ष किशोर राठी, सचिव गजानन देशमुख, संदीप नागोरी, नितीन गुप्ता, अनुराग कल्याणी, अजय गांधी, शिवप्रसाद जाजू यांची उपस्थिती होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत