मराठा आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत ‘मेगाभरती’ला स्थगिती, नोव्हेंबरपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू: मुख्यमंत्री

रायगड माझा वृत्त 

मुंबई-मराठा आरक्षणासाठी आवश्यक त्या सर्व पातळीवर राज्य सरकार प्रयत्नशील आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भातील वैधानिक कार्यवाही पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत राज्यात मेगाभरतीस स्थगिती देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही राजकीय कुरघोडी करण्याची वेळ नसून सत्ताधारी आणि विरोधक हा भेद विसरून एकदिलाने काम करून या प्रश्नावर एकत्र येऊन तोडगा काढण्याचे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलने होत आहेत. काही ठिकाणी त्यांना हिंसक वळण लागत आहे. आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी वृत्तवाहिन्यांवरून शांततेचे आवाहन केले. या निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती तर दिलीच, मात्र त्यासोबतच आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी होत असलेल्या विलंबामागील तांत्रिक अडचणही स्पष्ट केली. मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाशिवाय घेणे शक्य नसून तसा तो घेतल्यास हा आनंद काही काळच टिकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर यापुढेही कोणीही आत्महत्या किंवा जाळपोळ करू नये, अशी विनंती करतानाच सरकार या मुद्द्यावर खुल्या दिलाने आणि प्रामाणिकपणे संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवू पाहत असल्याचे ते म्हणाले. ही राजकीय कुरघोडी करण्याची वेळ नसून सत्ताधारी आणि विरोधक हा भेद विसरून एकदिलाने काम करून या प्रश्नावर एकत्र येऊन तोडगा काढण्याचे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले आहे.

राज्यातील गुंतवणूक घटेल
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडत असलेल्या घटनांमुळे राज्यातील गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होण्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. इपीएफओच्या गुंतवणूक विषयक अहवालाचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसात राज्यात आठ लाख रोजगार वाढले. देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास ४६ ते ४७ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. हे राज्य पुरोगामी आणि शांतताप्रिय असल्यामुळेच परकीय गुंतवणूक आकृष्ट होत आहे. मात्र राज्यात सध्या जे घडत आहे, ते पाहता आगामी काळात गुंतवणूकदार राज्यात येतील की नाही याबाबतची चिंताही त्यांनी व्यक्त केली.

आत्महत्या सर्वाधिक वेदनादायी
राज्यातील हिंसा संपली पाहिजे असे सांगतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून होत असलेल्या तरुणांच्या आत्महत्या या सर्वात वेदनादायी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारचे.चुकत असेल तर सरकारशी जरूर संघर्ष करावा, मात्र सरकार सकारात्मकतेने पुढे जात असेल तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे योग्य नसल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

समाजधुरिणांनाही केले आवाहन
शांततापूर्ण सुरू असलेले मराठा समाजाचे आंदोलन काही मुठभर लोकांमुळे बदनाम होत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी समाजातील नेतृत्वालाही सहकार्याचे आवाहन केले. मूठभर लोकांच्या दबावाला बळी पडून समाजातील या नेतृत्वाने जर नेतृत्व सोडले, तर समाज दिशाहीन होऊन जाईल अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री म्हणाले, औरंगाबादेत उद्योग कसे येतील ?
कचरा प्रश्न, जाती-धर्माच्या नावावर घडणाऱ्या घटनांचा उल्लेख औरंगाबादेत डीएमअायसी व औरंगाबाद-जालना औद्योगिक पट्ट्यात पायाभूत सुविधांमुळे उद्योग आकर्षित होत आहेत. मात्र औरंगाबाद शहरात कचऱ्याच्या प्रश्नावरून किंवा जाती-धर्माच्या नावावरून घडत असलेल्या घटना पाहता या पट्ट्यात भविष्यात उद्योग येतील का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. या घटना अशाच घडत राहिल्या तर शहराचा विकास भविष्यात खुंटेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

७ ऑगस्टला कालबद्ध कार्यक्रम सादर करणार
येत्या ७ अॉगस्टला मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील सुनावणीत आयोग कालबद्ध कार्यक्रम सादर करेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत सरकार मेगाभरती सुरू करणार नाही, या हमीचा पुनरुच्चारही केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य कसे असावे याची व्यवस्था घालून दिली आहे. त्याच मार्गाने पुढे जात या सर्व प्रश्नातून एकत्रितपणे तोडगा काढूया, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

धनगर आरक्षणाचा अहवाल ऑगस्टच्या अखेरीस
निवेदनात मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. धनगर आरक्षण देण्यासाठी आवश्यक असलेला अहवाल ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य सरकारकडे सादर होणार असून त्यानंतर सरकार आवश्यक त्या सर्व वैधानिक बाबी पूर्ण करून सत्वरपणे कारवाई करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

खा. गावितांच्या कारवर निदर्शने
धुळे : नंदुरबार येथील खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाहनावर मराठा क्रांती मोर्चातील काही आंदोलकांनी रविवारी असा हल्लाबोल केला.

मराठा आरक्षणासाठी अर्धापूर तालुक्यात तरुणाची आत्महत्या
नांदेड : अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथे शनिवारी मध्यरात्री गणपत बाबूराव आबादार (३८) या युवकाने छतावरून उडी घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील दाभड येथे कचरू कल्याणे यांच्या आत्महत्येनंतर शनिवारी मध्यरात्री आबादार या तरुणाने ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, एक मराठा लाख मराठा’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत