मराठा आरक्षणाची लढाई लढणारे विनोद पाटील लढणार राजकीय लढाई

रायगड माझा वृत्त 

मराठा क्रांती मोर्चा आणि त्यानंतर मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील हे आता राजकारणाची लढाई लढणार आहेत. औरंगाबादमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होत आहे. त्या जागेसाठी विनोद पाटील हे निवडणूक लढणार आहेत.

मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व करणारे आणि त्यानंतर मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाईमुळे विनोद पाटील हे नाव चर्चेत आलं. सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर विनोद पाटील यांनी न्यायालयात हे आरक्षण टिकावं यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर आता लवकरच विनोद पाटील हेदेखील राजकारणाचा मैदानात दिसणार आहेत. औरंगाबादच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते विधान परिषदेच्या आमदार पदासाठी निवडणूक लढणार आहेत. औरंगाबादमध्ये शिवसेनेचं वर्चस्व असल्याने ही जागा शिवसेना जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून काही नावं चर्चेत आहेत. यामध्ये राज्यमंत्री आणि मराठवाड्यातील शिवसेनेचे वजनदार नेते अशी ओळख असलेले अर्जुन खोतकर, शहरप्रमुख राजू वैद्य, जिल्हाध्यक्ष नरेंद्र वैद्य यांच्यासह विनोद पाटील यांचंही नाव चर्चेत आहे. न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निकाल आल्यानंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यातील विविध पक्षातील नेत्यांची भेट घेत आभार मानले होते. यावेळी विनोद पाटलांनी मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विनोद पाटलांसह सर्वांचं अभिनंदन केलं होतं. त्यामुळे या विधान परिषदेच्या निवडणुकीत विनोद पाटील हे शिवसेनेकडून लढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत