मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नागोठण्यात उत्स्फूर्त बंद!

नागोठणे : महेंद्र म्हात्रे

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागोठणे शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अगोदरच सर्व कार्यालय बंद आहेत, त्यात मराठा समाजाचा आंदोलनामुळे  नागोठणे शहरातील सर्व दुकाने, शाळा,  कॉलेज बंद ठेवण्यात आले. एसटी वाहतूक पूर्णपणे बंद होती.

 

आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला आज नागोठण्या 100 टक्के यश मिळाले. दुपारी बारा वाजता येथील श्री जोगेश्वरी मंदिरापासून रँलीचे आयोजन करण्यात आले होते.  संजय महाडिक, चेतन कामथे, माजी सरपंच जनार्धन सकपाळ,विनायक गोळे, नाना पवार, अल्विन नाकते, सुधाकर पत्की, सुदेश येरुणकर, सुरेश गिजे, रमेश केदारी, भरत गिजे सुनील लाड, मंदार चितळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत मराठा समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.
मंदिरापासून काढण्यात आलेला मोर्चा, शिवाजी चौक, बाजारपेठ, खुमाचा नाका, गांधी चौक, प्रभुआळी मार्गे पुन्हा मंदिराजवळ आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत होऊन अनेक वक्त्यांनी आंदोलनामागील भूमिका विषद केली. मोर्चात दिलेल्या घोषणांमुळे नागोठणे शहर दणाणून गेले होते. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पो. नि. दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर रेल्वे वाहतूक सुध्दा सुरळीत असल्याचे रेल्वे स्थानकातून स्पष्ट करण्यात आले. शहरासह विभागात बंद दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नसून महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान मराठा समाजाच्या वतीने शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील बहुतांश दुकाने बंद होती. प्रमुख बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौक, नुक्कड गल्ली, गांधी चौक, कोळीवाडा, मोहल्ला भागातील बहुतांश दुकाने बंद होती. दरम्यान अत्यावश्यक सेवा म्हणजे औषधांची दुकाने, दूध डेअरी मात्र सुरू होती. 
रायगड जिल्ह्यात एसटी वाहतूक पूर्णपणे बंद
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद ठेवण्यात आली.  नुकसान टाळण्यासाठी महामंडळाने हा पवित्रा घेतला आहे.  जिल्ह्यातील ६५९ एसटी बसची चाके आज ठप्प आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत