मराठा आरक्षणावरून विरोधक आक्रमक

नागपूर : रायगड माझा वृत्त 

मराठा आरक्षणावर राज्य सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी विधानसभेत गदारोळ केला. या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. त्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या चुकीमुळेच आधीचे आरक्षण टिकले नाही, असा पलटवार केला.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना मराठा समाजाच्या मागण्यांवर स्थगन स्वीकारण्याची मागणी केली. मराठा आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करीत असल्याने मराठा समाजाचा संयम सुटला आहे. मराठा समाजाचे पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. आरक्षण मिळाले नाहीतर आषाढी एकादशीची शासकीय पूजा रोखण्याचा इशारा मराठा मोर्चाने दिला आहे, असे विखे पाटील म्हणाले. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारने जाहीर केलेली नोकरभरती स्थगित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, की आघाडी सरकारच्या चुकीमुळे यापूर्वी दिलेले मराठा आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही. परंतु, भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल लवकर सादर करण्याची विनंती केली आहे. येत्या दोन तीन महिन्यात हा अहवाल अपेक्षित आहे.

आयोगाकडे १ लाख २० हजार निवेदने आली आहेत. ही निवेदने, सर्वेक्षण व राज्य सरकारकडे जमा आकडेवारी आधारे आयोग हा अहवाल तयार करेल. तोपर्यंत राज्य सरकारे मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरु झाल्याचे पाटील म्हणाले.

मात्र या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. एक मराठा, लाख मराठा… मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, अशा घोषणा दिल्या. भारत भालके आणि अब्दुल सत्तार हे तर अध्यक्षांच्या आसनाकडे धावले. या गदारोळामुळे कामकाज तीनवेळा तहकूब झाले

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत