मराठा आरक्षणासाठी आता काँग्रेस आमदारांचे राजीनामा अस्त्र

मराठा समाजाच्या बाजूने उभे राहात काँग्रेसच्या सर्व आमदारांनी सरकारविरोधात राजीनामा अस्त्र उगारण्याचे नक्की केले आहे.

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मराठा आरक्षणासाठी आता काँग्रेस आमदारांचे राजीनामा अस्त्र

मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चांगलाच पेटला आहे. मराठा बांधवांनी राज्यात ५८ मूक मोर्चे काढले तरीही त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही त्यामुळे हे आंदोलन तीव्र झाले आहे. आता मराठा समाजाच्या बाजूने उभे राहात काँग्रेसच्या सर्व आमदारांनी सरकारविरोधात राजीनामा अस्त्र उगारण्याचे नक्की केले आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणला जावा यासाठी हा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. विधिमंडळ पक्ष बैठकीत सगळ्या आमदारांनी राजीनामे देण्याचा प्रस्ताव मांडला ज्याला सगळ्या आमदारांनी एकमुखाने होकार दिला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्याऐवजी चिघळतच चालला आहे असे दिसते आहे.

सोमवारीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आर्थिक निकषांवर मराठा आरक्षण मंजूर करा असे म्हटले आहे. इतकेच नाही तर मागासवर्गीय अहवालाची वाट न पाहता लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा अशीही भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपासमोर अडचणी निर्माण झालेल्या असतानाच काँग्रेस आमदारांना राजीनामा अस्त्र उगारण्याचे नक्की केल्याने सरकारच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यास आषाढीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही असे आव्हान मराठा क्रांती मोर्चाने दिले होते. मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर ठेवत पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. तसेच वारीत साप सोडण्यात येणार असल्याचे गुप्तचर खात्याचे रिपोर्ट आल्याचेही सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आणि काकासाहेब शिंदे या तरूणाच्या जलसमाधीमुळे मराठा आंदोलनाला आक्रमक स्वरूप प्राप्त झाले. आंदोलनाची ही आग अजूनही राज्यात पेटलेलीच आहे. सोलापूर, पुणे, चाकण भागात आजही मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले. अशात आता काँग्रेसच्या आमदारांनी मराठा आरक्षण मिळावे ही मागणी पुढे करत राजीनामा अस्त्र उगारण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण प्रश्नी सर्व प्रकारच्या चर्चेची तयारी दर्शवली आहे. अशात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे नेमके काय होणार हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत