औरंगाबाद : रायगड माझा वृत्त
मराठा आरक्षणासाठी तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. आज (२३ जुलै) औरंगाबाद-नगर रोडवरील कायगाव येथे जलसमाधी आंदोलनादरम्यान २६ वर्षीय तरुणाने नदीत उडी घेतली. काकासाहेब दत्तात्रय शिंदे (रा. कानडगाव, ता. गंगापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कायगांव येथे गोदावरीत सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार जुने कायगाव येथे आंदोलन सुरू असताना काकासाहेब याने पुलावरून नदीच्या वाहत्या प्रवाहात उडी मारली. त्याला वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहत्या पाण्यात जुन्या पुलापर्यंत वहात गेला. त्याला स्थानिक पोहणा-या युवकांनी वाचवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु त्याचा जीव वाचवण्यात अपयश आले. यानंतर संतप्त आंदोलकांनी रस्त्यावर उतरून पुणे-औरंगाबाद मार्ग रोखला आहे.
दरम्यान, राज्यभरात विविध ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत. मराठवाड्यात या आंदोलनाचे प्रमाण अधिक असून औरंगाबादमध्ये गोदावरी नदीत आंदोलनाचाच भाग म्हणून जलसमाधी आंदोलन करण्यात येत होते.