मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्या वतीने माथेरानमध्ये ठिय्या आंदोलन!

माथेरान : मुकुंद रांजाणे 

राज्यात सर्वत्रच सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी रणशिंग फुंकलेले असताना एरव्ही थंड असलेल्या माथेरानकरांनी माथेरान गरम केले. सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज दि.६ रोजी सकाळी दहा वाजता श्रीराम मंदिर येथून अधीक्षक कार्यालयापर्यंत अंत्यत शांतपणे कुणाही राजकीय पक्षाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची खबरदारी घेऊन लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाचे आयोजन क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. विशेष म्हणजे या मोर्चात सर्वपक्षीय नेतेमंडळी तसेच सर्व धर्मीय लोक , सर्व समाज एकवटले होते.व्यापारी मंडळाने उत्स्फूर्तपणे आपली दुकाने दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेऊन पाठिंबा दर्शविला.आणि यामध्ये आरक्षित घटकांनी सुद्धा स्वेच्छेने आपला सहभाग नोंदवला.”आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला मिळालेच पाहीजे, ” एक मराठा लाख मराठा” अशा घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून गेला होता. महिला, लहान मुले, मुली, वयोवृद्ध नागरिक भगव्या टोप्या,भगवे ध्वज हातात घेऊन तसेच गळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले पट्टे घालून एकंदरीत वातावरण भगवेमय झाले होते. सुट्टयांच्या हंगामातील सोमवार असल्याने पर्यटकांची गर्दी नव्हती त्यामुळे कुणालाही अडचणीना सामोरे जावे लागले नाही. आरक्षणा सोबतच अन्य काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार हे निवेदन अधीक्षक कार्यालयातील जे. पी. उबाळे यांना सकल मराठा समाजाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.यावेळी अधीक्षक कार्यालयासमोर काही वेळ ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आले. भर पावसात चिंब भिजून देखील सर्व मोर्चेकरी ठिय्या आंदोलना साठी बसले होते.

आपल्या न्यायाहक्कांसाठी अनेकांनी आपल्या भावना शब्दरूपाने उपस्थितांसमोर कथन केल्या.प्रियांका शिंदे, सुहासिनी शिंदे, विद्यमान नगरसेविका प्रतिभा घावरे, शुभांगी कळंबे,महिला अध्यक्षा बीनाताई कदम, जेष्ठ कार्यकर्ते वसंत कदम, जनार्दन पार्टे, माजी नगरसेवक प्रकाश सुतार, कोकण वासीय समाजाचे अध्यक्ष शैलेंद्र दळवी यांनी आपले विचार प्रकट केले तर विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर यांनी उपस्थित जनसमुदायास आपल्या छोटेखानी भाषणातून मोलाचे मार्गदर्शन केले.

या अद्वितीय अन अभूतपूर्व माथेरानच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व समाज एकत्रित येऊन मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चा आणि ठिय्या आंदोलनाचे नियोजन क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष कुलदीप जाधव, माजी नगरसेवक प्रदीप घावरे,नागरी सहकारी पतसंस्था सभापती हेमंत बिरामणे यांनी केले. तर ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षत्रिय मराठा समाजाचे विकास पार्टे, दत्ता शिंदे,अमोल चौगुले, राहुल बिरामणे,नगरसेवक चंद्रकांत जाधव,मिलिंद कदम, सुनील कदम, राजू कदम, सुभाष रांजाणे, अनंत शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, गुजराती समाजाचे नितीन शहा, चर्मकार समाजाचे अध्यक्ष हेमंत पवार,बौद्ध समाजाचे संतोष शिंदे, धनगर समाजाचे कार्यसम्राट अध्यक्ष राकेश कोकळे, महादेव कोळी समाजाचे प्रमुख नेते मुकुंद रांजाणे, कोकण वासीय समाजाचे चंद्रकांत सुतार,धोबी समाजाचे राजेश चौधरी यांसह अन्य आजी माजी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

परीक्षेत चांगल्या प्रकारे गुणवत्ता मिळून देखील अन्य घटकांच्या विद्यार्थ्यांना कमी गुणवत्ता असताना केवळ आरक्षणामुळेच नोकरीत सामावून घेतले जात आहे.मराठा समाजाच्या मुलांना शैक्षणिक दृष्टीने उत्कृष्ट गुणवत्ता असून महाविद्यालयात प्रवेशासाठी लाखो रुपये मोजावे लागतात.येत्या नऊ तारखेला याबाबत निर्णय झाला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे होणार आहे. शासनाने वेळीच यावर निर्णय घेऊन आरक्षणाच्या कचाट्यातून मार्ग काढणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा नाईलाजाने ठोक मोर्चा केल्याशिवाय गत्यंतर नाही.

योगेश जाधव, कार्यकर्ते क्षत्रिय मराठा समाज

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत