औरंगाबाद : रायगड माझा वृत्त
गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुलावरुन गोदावरी नदीत उडी मारणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाने मदत जाहीर केली आहे. कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून काकासाहेब शिंदेंच्या भावाला सरकारी नोकरी दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कायगाव टोका येथे मराठा समाजाच्या नेत्यांनी मंगळवारी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. दुपारी तीनच्या दरम्यान कायगाव टोका येथील गोदावरी नदीवरील पुलाकडे मोर्चेकरी निघाले. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातच काकासाहेब शिंदे यांनी पुलावरून उडी मारली. त्यांचा तेथे मृत्यू झाला. काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करावी,अशी मागणी केली जात होती.
अखेर शिंदे कुटुंबियांना मंगळवारी सकाळी मदत जाहीर करण्यात आली. ‘महाराष्ट्र सरकारने मराठा क्रांती मोर्चाच्या बहुसंख्य मागण्या मान्य केल्या आहेत. आरक्षणासंदर्भातील अहवाल लवकरच सरकारकडे पाठवला जाईल. प्रशासनाच्या वतीने काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच त्यांच्या भावाला सरकारी नोकरी दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.
Maha govt has accepted most of the demands of Maratha Kranti Morcha&report for the demand for reservation will be sent to govt shortly. We’ll provide ex-gratia of Rs.10 lakh to the kin of youth who drowned in river.His brother will be given a govt job:Uday Choudhary,DM Aurangabad pic.twitter.com/LUsKrjkr3K
— ANI (@ANI) July 24, 2018
मागण्या मान्य झाल्यानंतर काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. सकाळी १० नंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता असून अंत्यसंस्काराला मराठा संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. या पार्श्वभूमीवर गंगापूरमधील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.