मराठा आरक्षण : बेफिकीर प्रशासनाने घेतला तरुणाचा नाहक बळी, आत्महत्या करणार असल्याचे दिले होते निवेदन!

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी कायगाव येथील गोदावरीच्या पुलावरुन उडी मारुन तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. कानटगाव (ता. गंगापुर) येथील काकासाहेब दत्तात्रय शिंदे असे आत्महत्या केलेल्या 28 वर्षीय तरुणाचे नाव आहे. आज सोमवारी (ता. 23) दुपारी 3 वाजता हा प्रकार घडला. या संदर्भातच एक अजून माहिती समोर आली आहे. ती म्हणजे औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना मराठा क्रांती मोर्चा संघटना ता. गंगापूर यांचेकडून जलसमाधीबाबत पुर्व निवेदन देण्यात आले होते.

मराठा आरक्षण : बेफिकीर प्रशासनाने घेतला तरुणाचा नाहक बळी, आत्महत्या करणार असल्याचे दिले होते निवेदन!

निवेदनात लिहील्याप्रमाणे, ‘शेतकरी आत्महत्येच्या यादीत महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या या मराठा समाजाच्या शेतकऱ्यांच्या आहेत. ज्यांच्या हाती आरक्षणासाठी विधानसभेत सर्वाधिक मराठा आमदार असुनही सत्तेच्या मोहापायी सर्व आमदार मुग गिळून गप्प आहे. मराठा समाजाच्या मागण्यांना बगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार कुठलाच धोरणात्मक निर्णय सरकार घेत नाही…’

मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे जलसमाधी आंदोलन करण्याचे निवेदन 22 जुलै ला औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानंतर सुद्धा येथे पुरेसा पोलिस बंदोबस्त करण्यात आला नाही. त्यामुळे आक्रमक आंदोलकांना अडविण्यास तेथे काहीच बंदोबस्त नव्हता. याचा परिणाम म्हणून काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. जीवरक्षक पथकातील दशरथ बिरुटे आणि टीमने तरुणाला बाहेर काढले. आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेतून काकासाहेब यांना उपचारासाठी कायगाव टोका येथून गंगापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. डॉक्‍टरांनी उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाकडे त्यांना रवाना केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत