मराठा आरक्षण : रोहन तोडकर याच्या कुटुंबियांना शासकीय मदत देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

कराड : रायगड माझा वृत्त 

कोपरखैरणे (नवी मुंबई) येथील मराठा आंदोलनावेळी जखमी झालेल्या चाफळ (ता. पाटण, जि. सातारा) खोनोलीतील रोहन तोडकर या युवकाचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. रोहन तोडकर याच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शंभूराज देसाई यांना मोबाईलवर संपर्क साधून दिली.

 

 

दरम्यान, देसाई यांनी याची माहिती रास्ता रोको केलेल्या मराठा समाज बांधवांना दिली. यावेळी मराठा समाज बांधवांनी रोहनवर हल्ला करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई होऊन त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच तोडकर कुटुंबातील एकास शासकीय नोकरी देण्यात यावी. याचबरोबर रोहन तोडकर याला शहीद घोषित करण्यात यावे, अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी तोडकर कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याची लेखी हमी प्रशासनाच्यावतीने दिली आहे.

रोहन तोडकर या युवकाचा मृतदेह चाफळ परिसरात सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आणण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसरात तणावाची स्थिती होती. चाफळमध्ये ग्रामस्थांनी रास्ता रोको करत दुपारी दीड वाजेपर्यंत रुग्णवाहिका तसेच पोलिसांना रोखून धरले होते. चाफळ येथे तणाव निर्माण झाल्याने आमदार शंभूराज देसाई यांच्यासह जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्यासह महसूल व पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

दुपारी 1 च्या सुमारास पोलिस अघीक्षक व जिल्हाधिकारी यांनी तोडकर कुटुंबियांशी चर्चा केली. याचवेळी शंभूराज देसाई यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क साधला. यावेळी रोहन तोडकर याच्या कुटुंबियांना मदत देण्याबरोबर संशयितांचा शोध घेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. याबाबतची माहीती देसाई यांनी संतप्त जमावाला दिली.

तसेच जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनीही रोहन तोडकर याच्या हत्येबाबातचा सकारात्मक अहवाल शासनास पाठविला जाईल, अशी लेखी हमी तोडकर कुटुंबियांना दिली. देसाई यांनी तोडकर कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करु, अशी ग्वाही दिली. तसेच मराठा क्रांतीचे समन्वयक शरद काटकर, जयेंद्र चव्हाण यांनीही तोडकर कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत मराठा समाज बांधव स्वस्थ बसणार नाहीत, अशी ग्वाही जमावाला दिली. त्यानंतर तब्बल चार तासानंतर दुपारी 1 च्या सुमारास चाफळ परिसरातून रुग्णवाहिका खोनोली गावाकडे रवाना झाली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत