‘मराठा क्रांती मोर्चा’कडून आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा

मराठा आरक्षणाबाबत 15 नोव्हेंबरपर्यंत भूमिका जाहीर करा, अन्यथा एकाही लोकप्रतिनिधीला घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलाय.

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त 

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून लोकप्रतिनिधींना नवा अल्टिमेटम देण्यात आला आहे. मराठा आरक्षणाबाबत 15 नोव्हेंबरपर्यंत भूमिका जाहीर करा, अन्यथा एकाही लोकप्रतिनिधीला घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलाय.

औरंगाबादमधून मराठा क्रांती मोर्चाने आरक्षण आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा केली. यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर न केल्यास एकाही लोकप्रतिनिधीला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असं क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून सांगण्यात आलंय. मागील काही काळापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. राज्यभरात झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला नोव्हेंबर अखेरपर्यंत आरक्षण देऊ, असं आश्वासन दिलं आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाकडून हा नवा अल्टीमेटम देण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या ‘रायझिंग महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलं होतं. मागासवर्गीय समितीचा नोव्हेंबर अखेपर्यंत अहवाल येणार आहे. त्यानंतर सर्व पक्षाची मदत घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत