मराठा समाजाचे आता चूल बंद आंदोलन!

पुणे  : रायगड माझा वृत्त 

मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी यापुढे मराठे रस्त्यावरचे कोणतेही आंदोलन करणार नाहीत. आरक्षणाची मागणी पुढे रेटण्यासाठी नाविन्यपूर्ण आंदोलन समाजाने घोषित केले आहे. त्यानुसार येत्या १५ आॅगस्ट रोजी मराठ्यांच्या घराघोरी चूल बंद आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. 

 पुण्यात गुरुवारच्या (9 ऑगस्ट) क्रांतीदिनी ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने मराठ्यांची बदनामी झाली. त्यावर आत्मक्लेश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापुढे रास्ता रोको, रेल रोको यासारखी समाजाला वेठीला धरणारी व सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या आंदोलनांऐवजी जिल्हा-तालुका स्तरावर साखळी उपोषण केले जाईल, अशी घोषणा मराठा क्रांती मुक मोर्चा आणि सकल मराठा समाजाने केली आहे.

गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचे ठिय्या आंदोलन नियोजनाप्रमाणे शांततेत पार पडले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर सर्वांना घरी परतण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र आंदोलनात घुसलेल्या बाह्य शक्तींनी यावेळी धुडगूस घातला. क्रांती मोर्चाने हिंसेचे कधीही समर्थन केलेले नाही. त्यामुळे हिंसक कारवाया करणाऱ्यांचे आम्ही समर्थन करणार नाही. पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी, असा खुलासाही मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने करण्यात आला. मोर्चाचे आयोजक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, विकास पासलकर, बाळासाहेब अमराळे, विराज तावरे आदींनी शुक्रवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.

कुंजीर यांनी सांगितले, की यापुढची आंदोलने आचारसंहितेचा फलक लावून केली जातील. आमच्या आंदोलनांमध्ये बाहेरच्या शक्ती घुसल्या तरी आमचे स्वयंसेवक त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली करतील. आचारसंहितेनुसार येत्या चक्री उपोषणासह यापुढची सर्व आंदोलने शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने होतील. अन्य कोणत्याही व्यक्ती अथवा नेत्यांनी स्वतंत्रपणे आंदोलन करु नये. केल्यास त्यांचा आणि मराठा क्रांती मुक मोर्चाचा त्याच्याशी संबंध राहणार नाही. मराठ्यांची बदनामी होईल असे कोणतेही भडक संदेश सोशल मिडियातून पसरवू नयेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत