महाआघाडीत मनसेला सोबत घ्या: राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई :रायगड माझा वृत्त 

देशपातळीवर भाजपा विरोधात महाआघाडी करून निवडणुका लढण्याची तयारी काँग्रेस तसेच समविचारी पक्षांनी सुरू केली आहे. भाजपाविरोधी पक्षांची एकजूट करत असताना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांसमोर ठेवला आहे. मात्र या प्रस्तावास काँग्रेसने विरोध केला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यातील समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांची एकजूट करून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप बहुजन महासंघ, लोकभारती आदी पक्षांच्या नेत्यांसोबत प्राथमिक चर्चा देखील करण्यात आली आहे. आघाडीच्या नेत्यांच्या अलिकडेच झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनसेला महाआघाडीत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मनसेला सोबत घेतल्यास उत्तर भारतीय मतदार दुरावण्याची भीती काँग्रेसला आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज ठाकरे यांच्या मनसेने पाठिंबा दिला होता. नुसता पाठिंबाच नाही, तर हा बंद करण्यात सक्रिय सहभाग मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. शहरीभागात आजही मनसेची पकड मजबूत असून त्यांना सोबत घेतल्यास भाजपा विरोधातील लढाईस बळ मिळून आगामी निवडणुकांत त्याचा फायदा होईल, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी उघडपणे कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही. मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्षांनी या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध असून मनसे महाआघाडीचा भाग नसेल,असे म्हटले आहे.

महाराष्ट्रात येणार्‍या उत्तर भारतीयांच्या लोढ्यांना विरोध हा मनसेचा मुख्य अजेंडा आहे. मनसेनेच्या आंदोलनाचा फटका आजवर उत्तर भारतीय समाजातील लोकांना नेहमीच बसला आहे. त्यामुळे त्यांचा मनसेवर राग आहे. काँग्रेस हा देशव्यापी पक्ष असून अशी आघाडी झाल्यास उत्तरेकडील राज्यांत निवडणुकीत काँग्रेसला जोरदार फटका बसू शकतो. त्यामुळे मनसेला आघाडीतसोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे. मनसेशी आघाडी केल्यास मराठी मतांमध्ये फूट पडून त्याचा फायदा महाआघाडीतील घटक पक्षांना होईल, अशी आशा राष्ट्रवादीला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत