महाडमध्ये हवेत गोळीबार, SRPF मधील निवृत्त अधिकाऱ्याला अटक

सयाजी जाधव याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडून ट्रेल बोअरची बंदूक व एक छोटी एअरगन ताब्यात घेतली आहे.

महाड : रायगड माझा वृत्त

महाड तालुक्यातील पंदेरी गावात सार्वजनिक ठिकाणी एका इसमाने बंदुकीतून फायरिंग केल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी सयाजी रामचंद्र जाधव (46), महेंद्र म्हामूनकरसर राज्य राखीव दलातील निवृत्त अधिकारी सुभाष मोरे यांना अटक केली आहे. या गोळीबाराचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून गोळीबारामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते.

सयाजी जाधव हे महाड तालुक्यातील पंदेरी गावातील रहिवासी असून सोमवारी गावातील सार्वजनिक ठिकाणी कोणत्यातरी कारणावरून भांडण होऊन जाधव यांनी आपल्या जवळील दोन बोअरच्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. यामुळे गावात भीतीचे वतावरण पसरले होते. या घटनेनंतर गोळीबाराची माहिती महाड एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सयाजी जाधव याला अटक केली.

सयाजी जाधव याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडून ट्रेल बोअरची बंदूक व एक छोटी एअरगन ताब्यात घेतली आहे. सयाजी जाधवकडे ही शस्त्र कोठून आली याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता महेंद्र म्हामूनकार यांच्याकडून घेतले असल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यानंतर महेंद्र म्हामूनकार याला पोलिसांनी ताब्यात घेतली. त्याचीही चौकशी केली असता राज्य राखीव दलाचे निवृत्त अधिकारी सुभाष मोरे यांच्याकडून शस्त्र घेतले असल्याचे समोर आले. त्यानंतर सुभाष मोरे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

गोळीबार प्रकरणात महाड एमआयडीसी पोलिसांनी तिन्ही आरोपीना अटक केली आहे. या गुन्ह्याबाबत रात्री उशिरा महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम विनापरवाना अग्निशस्त्र (कलम 3/25 प्रमाणे), शस्त अधिनियम.G 3(1), 25.27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सपोनि आबासाहेब पाटील करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत