महाडिक-मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली; तणाव

कोल्हापूर : रायगड माझा वृत्त

रिचेबल आणि नॉट रिचेबलच्या आरोप-प्रत्यारोपावरून खासदार धनंजय महाडिक आणि प्रा. संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांत  जुंपली. एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या संवाद कार्यक्रमात दोन्ही गटांत वाद झाला. त्यानंतर तुफान घोषणाबाजी झाली. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले. त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद निवळला. या वादातून आगामी लोकसभा निवडणूक कोणत्या थराला जाऊ शकते, याची चर्चा उपस्थितांत सुरू होती.

लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे विविध टीव्ही वाहिन्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांची भूमिका व विद्यमान खासदारांची कामे, विविध राजकीय पक्षांची मते जाणून घेण्यासाठी टीव्ही शोचे आयोजन करत आहेत. असाच एक कार्यक्रम आज दसरा चौकात झाला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई व्यासपीठावर होते. समोर मोठ्या संख्येने मंडलिक आणि महाडिक गटाचे कार्यकर्ते होते.

कार्यक्रमाच्या मधल्या टप्प्यात प्रेक्षकांमध्ये असलेल्या वीरेंद्र मंडलिक यांनी नव्या शिवाजी पुलासाठी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीच निधी मिळवून दिला; त्याचे श्रेय मंडलिकांनाच आहे, असे सांगितले. याला आक्षेप घेत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, की वीरेंद्र यांना काही माहिती नाही. पुलाच्या कामात आलेल्या अनंत अडचणी दूर करण्याचे काम आपण केले. त्यांनी वीरेंद्र यांचा मुद्दा खोडण्याचा प्रयत्न केला. पुलाच्या श्रेयवादावरून वीरेंद्र मंडलिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. ऐतिहासिक दसरा चौकात राजकीय वातावरण आणि चर्चा चांगलीच तापत गेली.

पुढच्या टप्प्यात खासदार महाडिक यांनी, ‘‘माझे राजकीय प्रतिस्पर्धी असणारे संभाव्य उमेदवार सायंकाळी सातनंतर नॉट रिचेबल असतात. आता कोठे आहेत? मी येथे आहे, ते कोठे आहेत? ते बाराला उठतात, आजही या चर्चेला ते का आले नाहीत, ते कोठे आहेत,’’ अशी विचारणा उपस्थित श्रोते आणि टीव्ही चॅनेलच्या अँकरला केली. त्यामुळे प्रेक्षकांत असणारे वीरेंद्र मंडलिक व त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

चला दाखवतो, मंडलिक कोठे आहेत ते! 
वीरेंद्र मंडलिक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार महाडिक यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला. ‘‘चला, प्रा. मंडलिक कोठे आहेत, काय करत आहेत हे तुम्हाला दाखवतो,’’ असे म्हणत एका कार्यकर्त्यांनी थेट प्रा. मंडलिकांनाच फोन लावून तो अँकरला देण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक टीका चालणार नाही, असे म्हणत घोषणाबाजी सुरू केली. यावेळी प्रेक्षकांत बसलेले माजी महापौर सुनील कदम, विजय देसाई यांच्यासह महाडिक गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही गट आमने-सामने आले. त्यामुळे येथे एकच गोंधळ उडाला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. या वेळी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर यांच्यासह सर्व कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे टीव्ही चॅनेलचा हा कार्यक्रम पोलिस बंदोबस्तात पार पाडावा लागला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत