महाबळेश्‍वरमध्ये विनापरवाना शुटिंग, वनविभागाकडून कारवाई

रायगड माझा वृत्त

चित्रपट निर्माते अमीन सलीम हाजी हे आपल्या आगामी ‘कोई जाने ना’ या चित्रपटाचे शुटिंग रात्रीच्या वेळी वेण्णा लेक परिसरात विनापरवाना करत असताना आढळून आल्याने महाबळेश्‍वर वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड यांच्या पथकाने धडक कारवाई करत १२ वाहनांसह सुमारे एक कोटींपेक्षा अधिक रकमेची मालमत्ता जप्त केली. याप्रकरणी निर्माते अमीन सलीम हाजी (वय ४८, रा.पाचगणी) यांच्यावर वन विभागाच्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाबळेश्‍वर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. रहस्यमय कथा असल्याने चित्रपटामध्ये रात्री जंगलामधील काही दृश्ये आहेत. ही दृश्ये चित्रित करण्यासाठी वन विभागाची परवानगी न घेता वनक्षेत्रात रात्री साडेआठ वाजता चित्रपटाच्या युनिटने वेण्णालेक पेटीट रोड दरम्यान चित्रीकरण सुरू केले. रात्री दहाच्या दरम्यान ही खबर वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड यांना मिळाली. वनपाल सुनील लांडगे, वनरक्षक सहदेव भिसे, लहू राऊत, रमेश गडदे, ज्योती घागरे, संगीता देसाई व विद्या घागरे या सहकार्‍यांना बरोबर घेवून ते जंगलात गेले असता तेथे चित्रपटाचे शुटींग सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने चित्रपटाचे शुटींग बंद पाडले व चित्रपटाच्या शुटींगसाठी वापरण्यात आलेल्या कार, टेम्पो व अशी १२ वाहने, कॅमेरा असे एक कोटींपेक्षा अधिक रक्कमेचे साहित्य जप्त केले. महाबळेश्‍वर वन विभागाने अमिन सलिम हाजी यांच्यावर भारतीय वन अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. वनपाल एस. के. नाईक पुढील तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत