महाराष्ट्रातील गडकिल्ले हीच छत्रपती शिवाजी महाराजांची खरी स्मारके

गडकिल्ल्यांचे जनत केले तरच पुढील पिढीला इतिहास कळणार : राज ठाकरे 

महाड : मयुरी खोपकर 

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हीच छ. शिवाजी महाराजांची खरी स्मारके आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करण्यापेक्षा या गडकिल्ल्यांचे संवर्धन करा हीच भूमिका फार पूर्वीपासून आपण घेत आलो आहोत आपली तीच भूमिका आज देखील कायम आहे. हे गडकिल्ले जनत केले तरच पुढील पिढीला इतिहास कळणार आहे असे वक्तव्य मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाडमध्ये केले. आपल्या रायगड दौऱ्यादरम्यान श्री. राज ठाकरे हे आज महाड येथे आले होते.त्यावेळेस त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
परप्रंतिय येथे येतात, झोपड्या बांधतात नंतर आपल्याच जागा जमिनी खरेदी करतात. आपले जे काही आहे ते आपण गमावून बसत चाललो आहोत असे ते म्हणाले. उद्योगधंद्यांमध्येहि मराठी माणसाला स्थान नाही. कंत्राटी पध्दतीने परप्रंतिय कामगार आणून उद्योगधंदे चालविले जात आहेत. मराठी माणसाचा रोजगार परप्रांतियांकडून हिरावून घेतला जात आहे असे टीकास्त्र ही त्यांनी सोडले.  जिल्हास्तरावर मनसे स्थानिक प्रश्न हातात घेऊन आंदोलन करीत नाही असा प्रश्न विचारला असता, मनसेकडून जिल्हा पातळीवरील प्रश्न देखील हाताळले जातात,  सर्वच जिल्ह्यांमध्ये माझे पदाधिकारी चांगले काम करीत आहेत पण त्यांचे काम माध्यमांना दिसत नाही असा टोला श्री. ठाकरे यांनी लगावला. सत्ता टिकविण्याचा प्रयत्न सर्वांकडून सुरू आहे. त्यासाठी चुकीचे पायंडे पाडले जात असल्याचे  टीकास्त्र यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकावर सोडले.
कर्नाटकमधील राजकीय घडामोडींबद्दल त्यांना छेडले असता, कर्नाटकात काँग्रेस आणि जनजा दल (सेक्युलर) एकत्र येणार असतील तर त्यात काहीच चुकीचे नाही. मात्र कर्नाटकचे राज्यपाल हे गुजरातमधील आहेत. २००१ मध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपली विधानसभेची जागा रिकामी करून दिली होती. ते नरेंद्र मोदी यांच्या गुडबुक्समधील आहेत. त्यामुळे ते कर्नाटकात भाजपाच्या हिताचीच भूमिका घेतील असे स्पष्ट मत श्री. ठाकरे यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाने देशातील पत्रकारितेचा आवाज दाबून टाकला आहे. उद्या अन्य कोणत्याहि पक्षाचे सरकार सत्तेत आले तर ते देखील असेच करतील त्यामुळे या देशातील पत्रकारिताच संपुष्टात येण्याची भीति आपल्याला वाटते आहे असेहि मत त्यांनी यावेळेस व्यक्त केले.
मंगळवारी रात्री श्री. ठाकरे यांचे महाडमध्ये आगमन झाले. आज सकाळी त्यांनी प्रथम पोलादपूर येथे जाऊन तेथे मनसैनिकांशी चर्चा केली. त्यानंतर महाड शहरात त्यांनी शिवाजी चौकामध्यसे छत्रपती शिवाजी महाराज आणि चवदार तळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या दौऱ्यामध्ये मनसेचे नेते नितीन सरदेसाई, मुंबई महानगरपालिकेतील मनसे नगरसेवक संजय तुर्डे, मनोज चव्हाण, संजीव नाईक, श्री. अभ्यंकर,अनिल शिदोरे, श्री. सांगळे,  मनसेचे कोकण विभाग संघटक वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड हे सहभागी झाले होते. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन उतेकर यांनी महाड येथे त्यांचे स्वागत केले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत