महाराष्ट्रावर भगवा फडकवणारच! – उद्धव ठाकरे

मुंबई : रायगड माझा वृत्त 

भगवा फडकवण्याचा निर्धार तुम्ही करून आलाच आहात. शिवसेनेचा मुख्यमंत्री मी महाराष्ट्रात करणार म्हणजे करणारच. जे कोण आव्हान देणार असतील त्यांना मी सांगतो की देऊन बघा आव्हान! तुमचं आव्हान तोडून मोडून तुमच्या छातडावर बसून माझा शिवसैनिक शिवसेनाचा भगवा फडकवेल, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाही, जो प्रयत्न करेल त्याचे तुकडे करू. विकासाच्या आड येणारे नतद्रष्ट आम्ही नाहीत. पण मराठी माणसांचं थडगे बांधून तुमचे इमले बांधले जाणार असतील तर तुमचे थडगे बांधल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

तसेच दहशतवाद्यांना धर्म नसतो बोलताना ठिक आहे, पण मग मग रमजानमध्ये शस्त्रसंधी का केली? दुसरा मुहूर्त मिळाला नाही?, असा खणखणीत सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या देशभक्तीचा बुरखा टराटरा फाडला.

शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाने शिवसैनिकांमध्ये नवं चैतन्य निर्माण केलं. सत्तेसाठी भाजपची नीती, त्यांनी हिंदुत्वाशी केलेली तडजोड, कश्मीरमध्ये आज तोडावी लागलेली युती, बांगलादेशी हिंदू संदर्भातील येऊ घातलेलं विधेयक, राष्ट्रवादी पवारांची मराठी माणसाला तोडण्याची खेळी या सर्वांवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार आसूड ओढले. आपल्या भाषणात बोलतांना त्यांनी मुंबई तोडण्याच्या हालचाली करणाऱ्यांना देखील इशारा दिला.

जम्मू-कश्मीरच्या सरकारचा पाठिंबा भाजपने काढून घेतला, त्यांचं अभिनंदन आहे. पण जम्मू-कश्मीरचं सरकार हे नालायक आहे कळायला तुम्हाला आज तीन-साडे तीन वर्ष लागली?, त्याच्यासाठी माझ्या भारत मातेचे ६०० जवान शहीद व्हावे लागले? आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळलं ते नालायक आहेत, असा खणखणीत सवाल त्यांनी भाजपला यावेळी केला.

आमच्याशी काडीमोड करताना विचार केला नाही. शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि हिदुत्व म्हणजे शिवसेना, आम्ही हिदुत्व कधी सोडलं नाही. सत्ता आली काय आणि गेली काय. गेलेली सत्ता आम्ही परत खेचून आणू, पण हिंदुत्व कधी सोडणार नाही, हे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.

 

रमजान आला शस्त्रसंधी केली, ही काही कश्मीर सरकारनं केली नव्हती केंद्र सरकारनं केली होती. आज ज्या सरकारचा तुम्ही पाठिंबा काढला त्या सरकारनं शस्त्रसंधी नव्हती केली. कारण सैन्य केंद्र सरकारच्या अखत्यारित असतं. ईदसाठी घरी जात असलेल्या औरंगजेबला मारलं. अशा लोकांसाठी शस्त्र संधी करता. पाकिस्तान कधी नवरात्र-दिवाळी-गणपतीला शस्त्रसंधी करतं का?, असा सवाल करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

मी अनेकदा सांगितलं आहे की आम्ही कुणीही गोहत्येच्या बाजूनं नाही, असू शकत नाही पण केवळ गायीला वाचवणं हे हिंदुत्व नाही. पण तो औरंगजेब हा धर्मानं मुसलमान असला तरी माझ्या देशासाठी बलिदान केलं त्या पाकड्यांना शरण न जाता त्यानं मरण पत्करलं, त्याला मुजरा करणं हे आमचं हिंदुत्व, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदी मंगळावरती रवाना, उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

मोदींच्या घरावर उडती तबकडी फिरताना दिसलं नाही, अशी बातमी होती. बरोबर आहे आता पृथ्वीवर बघण्यासारखं राहिलं नाही. त्यामुळे पुढे चार दिवसात बातमी येईल मोदी मंगळावरती रवाना, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. मोदींचे आता परग्रहावर दौरे सुरू होतील, चार वर्ष देशात थापा मारून झाल्या आहेत आता तिथे जाऊन थापा मारतील, असेही ते म्हणाले.

जनतेसाठी आम्हाला सत्ता हवी

सत्तेच्या लालसेपायी मला भगवा नाही फडकवायचा आणि तसं मी त्याला काम सुद्धा करू देणार नाही. मला सगळं पाहिजे म्हणून मला सत्ता पाहिजे असं नाही. तर जनतेला काय पाहिजे, जनतेसाठी म्हणून मला भगवा पाहिजे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत