‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ लुटली, सोन्याचे दागिने ओरबाडून चोरटे पसार

श्रीगोंदा : रायगड माझा वृत्त 

दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर बेलवंडी रेल्वे स्थानकाच्या मुख्य मार्गालगतच्या ‘आउटर’वर थांबलेल्या महाराष्ट्र एक्सप्रेसमधील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी ओरबाडून नेले. रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून गोंदियाकडे जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस दौंड-मनमाड रेल्वे मार्गाने जात होती. पहाटेच्या सुमारास ही गाडी बेलवंडी रेल्वे स्थानकावर थांबली. सिग्नल नसल्यामुळे मुख्य मार्गालगतच्या ‘आउटर’वर गाडी थांबलेली होती. पहाटेची वेळ असल्याने प्रवासी झोपलेले होते. त्याचवेळी काही चोरट्यांनी थांबलेल्या रेल्वेतील जनरल डब्यात खिडकीच्या बाजूने बसलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले. दागिने ओरबडल्यामुळे महिलांना जाग आली. त्यांनी आरडाओरड करताच चोरटे पसार झाले. काही वेळानंतर सिग्नल मिळताच रेल्वे मार्गस्थ झाली.

महाराष्ट्र एक्स्प्रेस नगरला पोहोचल्यानंतर दोन महिलांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दोन मंगळसूत्र लांबविल्याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पालवे हे करत आहेत. दरम्यान रेल्वे पोलिसांनी बेलवंडी रेल्वे स्टेशन येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत