महाराष्ट्र बंद : कुठे इंटरनेट बंद, कुठे महामार्गावर ठिय्या

महाराष्ट्र : रायगड माझा वृत्त 

गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदमध्ये मुंबईचा समावेश असला, तरी नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा समाज सहभागी होणार नाही. मराठा समाज समन्वयक आणि पोलिसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

वारंवार नागरिकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगून नवी मुंबई आणि ठाण्यातील मराठा संघटनांनी बंदमधून माघार घेतली आहे. या ठिकाणी बंदऐवजी ठिय्या करुन निषेध नोंदवला जाणार आहे.आजच्या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळं दूध, शाळा-महाविद्यालये आणि वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरु राहतील. पण खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील काही शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुट्टीचा निर्णय मुख्याध्यापकांकडे सोपवला होता. यानुसार काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी हा निर्णय घेतला आहे..

मराठा समाजाला आरक्षण द्यावं, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित करावी, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागण्यात मराठा आंदोलकांच्या आहेत. त्यापैकी मेगा भरती स्थगित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑगस्ट रोजी केली.

मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा 23 जुलैला गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर 25 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर आज 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिनाचं औचित्य साधत, मराठा मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत