‘महाराष्ट्र भाजपसेना मुक्त करण्यासाठी आरपारची लढाई’

सोलापूर :  रायगड माझा 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पेट्रोल-डिझेल दरातील वाढ, महागाई, दुष्काळी अनुदान, दूधाचा दर, बेरोजगारी, फसवी कर्जमाफी यामध्ये युती सरकारने फक्त आकड्यांचा खेळ करून राज्यातील जनतेला फसविण्याचे पातक केलेले आहे. आपापसात भांडायचे आणि सत्तेचा मलिदा वाटून खायचा असा प्रकार सध्या सुरू आहे. या सरकारला हटवायचे असेल तर, आता रस्त्यावर उतरून आरपारचा संघर्ष करण्याची तयारी करावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला

अकलूज (ता.माळशिरस) येथे आगामी लोकसभा व विधानसभा  निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने श्रीराम चित्रमंदिर येथे कार्यकर्त्यांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक चव्हाण मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,  आ. शरद रणपिसे, आ. हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, आ.भारत भालके, आ. रामहरी रूपनवर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, देवानंद गुंड पाटील,प्रकाश पाटील तुंगतकर, निर्मलाताई ठोकळ, कमलताई व्यवहारे, सुनेत्रा पवार, वैभव जगताप सोशल मीडियाचे अभिजित सपकाळ तसेच जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष,जिल्हा कार्यकारिणी सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘या सरकारच्या अपयशमुळे आपण सहज निवडून येऊ अशा अविर्भावात राहू नका. रात्र वैऱ्याची आहे सावध रहा. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण सर्व सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. सर्वजण दबावात आहेत. सहकार मोडीत काढला जात आहे. साखर कारखानदारीला जाणूनबुजून अडचणीत आणले जात असून, शेतकऱ्यांना संपविण्याचा विडाच या सरकारने उचलला असल्याचा घणाघात चव्हाण यांनी यावेळी केला.

सेवादलाच्यावतीने ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आ. शरद रणपिसे यांनी प्रास्ताविक करून शिबीर आयोजनाचा हेतु सांगितला तसेच मधुकर भावे यांनी कॉंग्रेसची विचारसरणी, ध्येयधोरण याविषयी माहिती दिली. हर्षवर्धन पाटील यांनी जनविरोधी सरकार व अस्वस्थ महाराष्ट्र याविषयी माहिती देवून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी झाली तरी जगाच्या बाबतीत काँग्रेस माघार घेणार नसल्याचे सूतोवाच केले. जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी लोकसभेसाठी माढा मतदारसंघावर हक्क सांगितला. तर माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीशी आघाडीचा निर्णय हा दिल्लीत होणार असून, एकप्रकारे स्वबळावर तयारीत राहण्याचा सल्ला दिला.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे बोलताना म्हणाले, आताचे सरकार आम्ही केलेल्या कामाचे उदघाटन करत आहे. आमच्याच योजना पुढे चालवत असून भपंक जाहिराती करून आपली पाठ थोपटून घेत आहे. येणाऱ्या निवडणुकांत यश मिळविण्यासाठी गावपातळीवर गावकमीट्या, बुथकमीट्या सक्षम केल्या पाहिजेत. आताच्या निवडणुका जास्त खर्चिक होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

पुणे व माढयासाठी कॉंग्रेसची फिल्डिंग 
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुणे काँग्रेसकडेच ठेवण्याबाबत आ. हर्षवर्धन पाटील यांनी पक्षश्रेष्ठी समोर ठणकावून सांगितले तर, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची ताकद पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आणून देवून उभयतांनी राष्ट्रवादीच्या दबाव झुगारून देण्याचे आवाहन यावेळी केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.