‘महाराष्ट्र सरकार म्हणा… ; ‘ठाकरे सरकार’ अशा उल्लेखाला नारायण राणेंचा आक्षेप

नागपूर: महाराष्ट्र News 24

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं पहिलंच अधिवेशन नागपुरात सुरू आहे. त्यामुळं या अधिवेशनाबद्दल सर्वसामान्यांबरोबरच नेत्यांनाही प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुसऱ्याच दिवशी नागपुरात दाखल झाले होते. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे तिथं पोहोचले होते. आज नारायण राणे हेही अधिवेशनस्थळी पोहोचले.

‘नव्या सरकारचं अधिशवेशन हे अधिवेशन असल्यासारखं वाटत नाही. एखादा घरगुती कार्यक्रम वाटतोय. तसंच इथलं वातावरण आहे,’ अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ‘ठाकरे सरकार’ अशा उल्लेखालाही त्यांनी जोरदार आक्षेप घेतला.

राणे विधान भवनात दिसताच पत्रकारांनी त्यांच्याभोवती गराडा केला. ठाकरे सरकारच्या पहिल्या अधिवेशनाबद्दल त्यांना पत्रकारांनी मत विचारलं. त्यावर राणेंनी ‘ठाकरे सरकार’ या शब्दप्रयोगाला आक्षेप घेतला. ‘हे महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन आहे. कोणाचं नाव त्याला जोडू नका,’ असं ते म्हणाले. ‘हे अधिवशेन असल्याचं वाटतच नाही. सगळं कसं घरगुती वाटतंय. सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही गोष्ट नियमाला धरून होत नाहीए, असंही ते म्हणाले. सरकारची कामगिरी कशी वाटतेय असं विचारलं असता, नेमकं काय चाललंय याची माहिती घेऊन बोलेन,’ असं ते म्हणाले. राणे यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. त्यात ते काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत