महाविकास आघाडीच्या निर्मितीतील प्रतिभाताईंचे योगदान समोर; नागपुरात कृतज्ञता सोहळा

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

राज्यात निर्माण झालेल्या त्रिशंकू स्थितीनंतर आपल्या 30 वर्षांपासूनच्या मित्र पक्षाची साथ सोडणाऱ्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी नवीन मित्राची गरज होती. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळाली. मात्र यावर भागत नसल्याचे पाहता, काँग्रेसकडे यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र शिवसेनेसोबत जाण्यास काँग्रेस फारसे उत्सुक दिसले नाही. मात्र माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे हे शक्य झालं.

महाविकास आघाडीच्या निर्मितीचे श्रेय प्रतिभाताई यांना जात असून त्यासाठी नागपुरात एक कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेसोबत गेल्यास दक्षिण भारतात काँग्रेस पक्षाला नुकसान होईल, अशी विचारधारा काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे महाविकास आघाडीत सामील होण्यासंदर्भात सोनिया गांधी तयार नव्हत्या. मात्र या संदर्भात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून शिवसेनेच्या राजकीय भूमिकेमुळे काँग्रेसला अनेकदा मदत झाल्याची आठवण करून दिली. त्यानंतर राज्यातील सत्तास्थापनेची कोंडी फुटली. महाविकास आघाडीच्या निर्मितीत अर्थातच प्रतिभाताईंनी योगदान दिल्याचे आता समोर आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच प्रतिभाताई यांनी ही मध्यस्थी केल्याचे सांगण्यात येते. ही बोलणी यशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्री होताच उद्धव ठाकरे यांनी प्रतिभाताई यांची भेट घेऊन आभारही मानले होते.महाविकास आघाडीकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रतिभाईताई यांचा सत्कारसोहळा आयोजित केला आहे. नागपुरात हा कार्यक्रम आयोजिला असून 19 डिसेंबर रोजी प्रतिभाताईंचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत