महेश आनंद यांचा तीन दिवसांपासून घरात पडून मृत्यू

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

Related image

खलनायकांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे अभिनेते महेश आनंद यांचा वर्सोव्यातील घरात मृतदेह आढळला असून शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचं निष्पन्न झालं असून पोलिसांनी इतर कोणतंही कारण नसल्याचं सांगितलं आहे. मात्र अद्यापही मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्राथमिक तपासात आणि सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे अद्याप तरी महेश आनंद यांच्या मृत्यूमागे कोणतं गूढ असल्याचं दिसत नाही आहे. तीन दिवसांपासून महेश आनंद यांचा मृतदेह घरात पडून होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश आनंद यांची पत्नी सध्या रशियात असून अंत्यविधीसाठी त्या भारतात येणार आहेत. 80 आणि 90 च्या दशकात महेश आनंद यांनी अनेक चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका साकारली होती. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली वाहत त्यांच्या भूमिकांची आठवण करुन दिली.

महेश आनंद वर्सोवा येथील फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘शनिवारी जेव्हा मोलकरीण घरी आली तेव्हा बेल वाजवूनही तिला काहीच उत्तर मिळत नव्हतं. अखेर वर्सोवा पोलिसांना कळवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या सहाय्याने दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी टीव्ही सुरुच होता’.

मृतदेह गेल्या तीन दिवसांपासून घरात पडून असल्या कारणाने कुजण्यास सुरुवात झाली होती. महेश आनंद यांनी ट्रॅक सूट घातलेला होता. त्यांच्या शेजारी प्लेस्ट्स पडलेल्या होत्या. कदाचित त्यांनी नुकतंच जेवण संपवलं होतं. याशिवाय दारुची बाटलीही त्यांच्या शेजारी होती. पोलिसांनी व्हॉट्सअॅप तपासलं असता गुरुवारी त्यांनी शेवटचं व्हॉट्सअॅप पाहिलं असल्याचं दाखवत होतं. यामुळे त्यांचा मृत्यू त्याच्या एक दिवस आधी किंवा त्याच दिवशी झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

फ्लॅटबाहेर पोलिसांनी जेवणाचे डबे सापडले आहेत जे त्यांनी काही दिवसांपासून घेतलेच नव्हते. महेश आनंद यांनी अमिताभ बच्चन, संजय दत्त, गोविंदा यांच्यासारख्या अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं. गोविंदाच्या रंगीला राजा चित्रपटात महेश आनंद यांनी अखेरची भूमिका केली. शेहनशहा (१९८८), मजबूर(१९८९), स्वर्ग (१९९०), थानेदार (१९९०), विश्वात्मा (१९९२), गुमराह (१९९३), खुद्दार (१९९४), बेताज बादशाह (१९९४), विजेता (१९९६) आणि कुरुक्षेत्र (२०००) या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या.

गेल्या १८ वर्षांपासून महेश आनंद आर्थिक अडचणींचा सामना करत होते. रंगीला राजा हा त्यांचा गेल्या १८ वर्षातील पहिला चित्रपट होता. माझा फक्त सहा मिनिटांचा रोल आहे. पण काम करायला मिळाले याचा आनंद आहे असे त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत